‘एल निनो’च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना चारा नियोजनाचे आवाहन पशुसंवर्धन विभाग सज्ज; चारा उत्पादन व साठवणुकीवर भर देण्याचे निर्देश

हवामान बदल आणि ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे उद्भवू शकणाऱ्या चारा टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना पोषक चारा पिकांची लागवड, मुरघास व सायलेज तंत्रज्ञानाद्वारे चारा साठवणूक करण्याचे आवाहन केले आहे. अडचणींसाठी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हवामान बदल आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज; अडचणींसाठी १९६२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन.

जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे आगामी काळात राज्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच चारा पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालक व शेतकऱ्यांना पोषक आणि बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गाई-म्हशींच्या आरोग्यासोबतच दूध उत्पादन स्थिर राहावे यासाठी उच्च दर्जाच्या चारा पिकांची लागवड करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी पिके निवडावीत की ज्यातून मुख्य शेतमालाबरोबरच जनावरांसाठी पोषक चारा उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक गवताचे योग्य जतन करावे, असेही सूचित करण्यात आले आहे. पावसाची कमतरता किंवा टंचाईच्या काळात हेच गवत पशुधनासाठी महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भविष्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणात चारा उत्पादन करण्यावर भर द्यावा तसेच अतिरिक्त चाऱ्याचे ‘मुरघास’ किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवणूक करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे टंचाईच्या काळात पशुखाद्याची अडचण निर्माण होणार नाही.

पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना मार्गदर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून, अडचणी किंवा शंकांसाठी १९६२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच खरीप व रब्बी हंगामातील चारा पिकांचे साठवण करण्यासाठी ‘सायलेज’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून फेब्रुवारी ते जून २०२७ या संभाव्य टंचाईच्या काळात त्याचा उपयोग करता येईल.

एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि वैज्ञानिक साठवणूक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!