बी. जे. महाजन विद्यालयात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे मार्गदर्शन

आणोरे येथील बी. जे. महाजन विद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि क्विक हील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आणोरे येथील बी. जे. महाजन विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी धरणगाव तालुक्यातील आणोरे येथील बी. जे. महाजन विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आजच्या डिजिटल युगातील विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित व्हॉइस कॉल फसवणूक, सोशल मीडियावरील बनावट प्रोफाइल, फिशिंग, बनावट वेबसाइट्स, संशयास्पद लिंक, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व तसेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चा प्रभावी वापर यासारख्या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये, मोबाईलवर आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, कोणतेही मोबाईल अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी तसेच सोशल मीडियाचा वापर करताना गोपनीयतेच्या (Privacy) सेटिंग्ज योग्य पद्धतीने वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सायबर गुन्ह्याचा सामना करावा लागल्यास तातडीने संबंधित यंत्रणेकडे किंवा सायबर हेल्पलाइनकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रम अधिक प्रभावी व्हावा यासाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा, डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत उपस्थितांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक महाले सर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि जबाबदारीने वापर करावा, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहावे तसेच सायबर सुरक्षिततेचे नियम दैनंदिन जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, सुरक्षित डिजिटल समाज आणि डिजिटल भारत घडविण्यास अशा उपक्रमांचा निश्चितच महत्त्वपूर्ण हातभार लागेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!