ग्रामपंचायत स्तरावरील ‘कमिशन संस्कृती’ पुन्हा चर्चेत; अमळनेरमध्ये ₹५० हजार लाच प्रकरणात अधिकारी अटकेत.
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, १२ लाख रुपयांच्या विकासकामांच्या बिलासाठी तब्बल ‘७ टक्के कमिशन’ मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यासह जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगाव बु. (ता. अमळनेर) येथील ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र देविदास पवार (वय ४८) यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर विकासकामांच्या बिलासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या चुलत भावाला आरसीसी गटार बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुमारे १२ लाख रुपयांची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने एकूण रकमेच्या ७ टक्के प्रमाणे ₹८४ हजारांची मागणी केल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीच ₹१३ हजार रुपये ऑनलाइन फोन-पे द्वारे स्वीकारल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित रकमेवर तडजोड करत अखेर ₹५० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने याबाबत ३० एप्रिल रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पंचांसमक्ष सापळा रचला. अमळनेर शहरातील केलेनगर परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. आरोपी रविंद्र पवार हे स्वतःच्या घरातच ₹५० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कमिशन संस्कृती’ पुन्हा चर्चेत
ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांच्या बिलांसाठी कमिशन मागितले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, या कारवाईने पुन्हा एकदा “टक्केवारीच्या खेळा”वर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एसीबीची धडक कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तागंडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने सापळा यशस्वीपणे रचला.
या कारवाईनंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली असून, “आता एसीबीची नजर गावपातळीवरील भ्रष्टाचारावरही आहे,” अशी चर्चा रंगू लागली आहे.

करण शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे प्राधिनिधी असून बातम्या आणि जाहिरातींकरीता संपर्क करावा-
✍️ करण (गुरू) शिंदे -8983956862
ईमेल- journalistgurubaba@gmail.com
