हिदायत नगरातील वाद हिंसक होऊन खून झाल्यानंतर जळगाव पोलीस दलात मोठी कारवाई; बोदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी निलंबित.
बोदवड परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यासह तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल आणि पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर फिर्यादी पक्षांमध्ये वाद वाढत गेला. परिस्थिती लक्षात घेऊन कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी योग्य ती कारवाई न केल्याने वाद अधिकच तीव्र झाला.
त्यानंतर १९ मे रोजी हिदायत नगर परिसरात दोन्ही गटांत पुन्हा वाद निर्माण झाला. या वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या एएसआय रवींद्र गुरचल यांनी परिस्थिती गांभीर्याने न हाताळता केवळ समज देऊन प्रकरण सोडल्याचा आरोप आहे. परिणामी २१ मे रोजी या वादाला हिंसक वळण लागून एकाचा खून झाला.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीची माहिती स्थानिक नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवली होती. तरीही प्रभारी अधिकारी दीपक सुरवडकर यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आणि नियंत्रणात अपयशी ठरल्याने तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
