गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ६२ वर्षीय व्यापाऱ्याला लुटले. जळगावमधील ३९ लाखांच्या सायबर फसवणुकीचा सविस्तर अहवाल आणि पोलिसांचे आवाहन.
जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याची ३९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळ रोडवरील नागेश्वर कॉलनीतील रहिवासी व्यापारी समीर नटवरलाल शहा (वय ६२) यांना १६ मे २०२५ ते ३ मार्च २०२६ या कालावधीत काही व्यक्तींनी संपर्क साधला. या आरोपींनी स्वतःला “सीइपीटी शेअर्स मार्केटिंग कंपनी, युके” चे प्रतिनिधी असल्याचे भासवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यात काहिरा मेहता, हेमंत मेहता तसेच सीइपीटी कस्टमर सर्विसचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले.
संशयित आरोपींनी शहा यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून त्यांनी शहा यांनी गुंतवलेल्या रकमेवर १०,००० रुपयांचा नफा परतही दिला. त्यामुळे शहा यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.
यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांवर वेळोवेळी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे समीर शहा यांच्याकडून एकूण ३९,००,००० रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळण्यात आले. मात्र, त्यानंतर कोणतीही रक्कम किंवा नफा परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी समीर शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० एप्रिल २०२६ रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करत आहेत.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि अनोळखी व्यक्तींच्या आकर्षक नफ्याच्या आमिषाला बळी पडू नये.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
