दहा लाख सीड बॉलचा संकल्प निसर्गाला हिरवागार करण्याचा एक सामूहिक प्रयत्न

सिंहगड घाट परिसरात F.O.R.E.S.T., माय सह्याद्री फाउंडेशन, वनसमिती घेरा सिंहगड आणि वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक प्रजातींच्या सीड बॉल रोपण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दहा लाख सीड बॉल निर्मितीचा संकल्प करत F.O.R.E.S.T. संस्थेने पश्चिम घाटात जैवविविधता संवर्धनासाठी व्यापक वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली.

Friends of Reptiles and Environmental Saving Trust (FO.R.E.S.T.) अंतर्गत सन २०२१-२०२२ मध्ये सीड बॉल निर्मितीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, यावर्षी नव्या जोमाने आम्ही दहा लाख सीड बॉल तयार करण्याचा संकल्प केला आहे.

आज दिनांक १२ जुलै २०२६ रोजी सिंहगड घाट परिसरामध्ये सीड बॉल्सचा कार्यक्रम आयोजित केला. फॉरेस्ट एनजीओ, माय सह्याद्री फाउंडेशन, वनसमिती घेरा सिंहगड आणि वनविभाग पुणे यांच्या संयुक्तपणे तसेच आजची प्रमुख उपस्थिती विशेष भूमी संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री हर्षद घुले साहेब यांच्या हस्ते बीजगोळे (सीड बॉल) रोपणाची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे स्थानिक प्रजातींचे पन्नास हजार बीज रोपण केले. तसेच पुढील दोन महिन्यांत आपण पश्चिम घाटात दोन लाख बीज गोळ्यांचे रोपण करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले असंख्य निसर्गप्रेमी यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवता येत आहे.

या सीड बॉलमध्ये आंबा, जांभूळ, चिंच, रामफळ, कारंजा, चिकू, भोकर तसेच विविध रानफुलांच्या आणि स्थानिक परिसंस्थेला पूरक असलेल्या मूळ प्रजातींच्या बियांचा समावेश करण्यात आला आहे. काही ठिकाणी वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांच्याही बियांचा वापर करण्यात आला आहे. स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या संपूर्ण उपक्रमामागे एकच विचार आहे – झाडतोडीमुळे निसर्गाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याकडून शक्य तितके योगदान देणे. जुनी पिढी म्हणायची, “किमान आपल्या अंतिम संस्कारासाठी लागतील एवढी तरी झाडे लावावीत.” आणि तेही शक्य नसेल, तर निदान आपण घेत असलेल्या श्वासाएवढा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी तरी झाडे लावावीत.

संस्थेचे अध्यक्ष सागर कुटे आणि उपाध्यक्ष मनोज शिंदे यांना सुचलेली ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बियाणे कुठून गोळा करायचे, त्यांचे वर्गीकरण कसे करायचे, योग्य प्रमाणात माती आणि इतर साहित्य कसे वापरायचे, तसेच मनुष्यबळाची उपलब्धता कशी करायची, अशा अनेक प्रश्नांवर मात करत हा उपक्रम पुढे नेण्यात आला.

अशा परिस्थितीत, गोठा आणि शेती व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे सुरज कवडे यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. कोणती झाडे कोणत्या भागात योग्य ठरतील, मातीचा प्रकार आणि तिची गुणवत्ता कशी ओळखायची, खताचे प्रमाण किती असावे, राख किती प्रमाणात मिसळावी, विविध घटकांचे योग्य कॅल्क्युलेशन कसे करावे आणि त्यांचा योग्य रेशो काय असावा, याबाबत त्यांनी एक-एक गोष्ट समजावून सांगितली. या सगळ्या अभ्यासानंतर आणि नियोजनानंतर प्रत्यक्ष कामाला वेग आला.

हळूहळू या उपक्रमाशी अधिकाधिक लोक जोडले गेले. अनेक स्वयंसेवक पुढे आले, तसेच वन विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभले. बघता बघता हा छोटासा प्रयत्न मोठ्या चळवळीत परिवर्तित झाला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जवळपास दोन लाख सीड बॉल तयार झाले आहेत.

विशेष म्हणजे, ज्या भागांमध्ये आम्ही सर्पमित्र म्हणून सापांचे रेस्क्यू करतो, तेथील नागरिकांकडून आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा मोबदला घेत नाही. त्याऐवजी, निसर्ग संवर्धनाच्या या कार्यासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्याच्या रूपाने आम्ही विविध झाडांच्या, फळांच्या आणि रानफुलांच्या बिया स्वीकारतो. हा एक प्रकारे माणूस आणि निसर्ग यांच्यातील सुंदर दुवा बनला आहे.

खानापूर, सिंहगड, पानशेत, वेल्हे, खडकवासला, डोणजे इत्यादी भागातील असंख्य नागरिक, शेतकरी आणि निसर्गप्रेमींनी लाखोंच्या संख्येने विविध वृक्षांच्या बियांचे दान करून या उपक्रमाला बळ दिले आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानामुळेच दहा लाख सीड बॉलचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.

या सर्व दात्यांचे, स्वयंसेवकांचे, वन विभागाचे तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या मोहिमेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.

विशेषतः – चेतन निगडे, गणेश सपकाळ, भास्कर भालेराव, कार्तिक माने, अजिंक्य कांबळे, अक्षय कांबळे, बस्वराज बनसोडे, प्रतीक महामुनी, प्रतीक वडनगरे तसेच इतरांनी श्रमदानाच्या माध्यमातून या उपक्रमात मोठा वाटा उचलला आहे. सीड बॉल निर्मिती, बियांचे संकलन, वर्गीकरण आणि विविध टप्प्यांवर त्यांनी घेतलेले अथक परिश्रम या मोहिमेच्या यशामागील एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या निःस्वार्थ सहकार्याबद्दल आणि निसर्गप्रेमाबद्दल आम्ही त्यांचे विशेष ऋणी आहोत.

आज Friends of Reptiles and Environmental Saving Trust (F.O.R.E.S.T.) चा हा उपक्रम केवळ सीड बॉल तयार करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो निसर्गाशी असलेली आपली जबाबदारी आणि भावी पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा एक सामूहिक संकल्प बनला आहे.

निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. मात्र विकासाच्या नावाखाली होत असलेली झाडांची तोड, कमी होत चाललेली जैवविविधता आणि बदलते हवामान यांचे परिणाम आज आपण अनुभवत आहोत. अशा परिस्थितीत केवळ निसर्ग संवर्धनाच्या गप्पा मारून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे.

सामान्य नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन सीड बॉल तयार करणे व त्यांचे योग्य ठिकाणी वितरण करण्यासाठी आमच्या संस्थेशी जोडावे. निसर्ग संवर्धन करणे हे केवळ बोलण्यापुरते न राहता, प्रत्यक्ष कृतीतून त्याला हातभार लावणे ही काळाची गरज आहे. आज आपण केलेला हा छोटासा प्रयत्न उद्याच्या पिढ्यांसाठी हिरवेगार आणि समृद्ध भविष्य घडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

“चला, निसर्ग संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी होऊया आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करूया.”

असा संदेश संस्थेचे सदस्य सागर चंद्रकांत बावळे पाटील यांनी दिला.

“एक सीड बॉल… उद्याचा एक वृक्ष… आणि एका वृक्षातून असंख्य जीवांना जीवन !”

Friends of Reptiles and Environmental Saving Trust (F.O.R.E.S.T.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!