हातकणंगले तालुक्यातील ऋतुजा पालखे आत्महत्या प्रकरणामुळे संतापाची लाट; मूक मोर्चा, निवेदन आणि न्यायासाठी ग्रामस्थांचा आवाज बुलंद.
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील विवाहित महिला सौ. ऋतुजा विशाल पालखे यांच्या संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी, यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा पालखे या मूळच्या हेरवाड (ता. शिरोळ) येथील रहिवासी होत्या. विवाहानंतर सासरी त्यांना मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी १८ मे २०२६ रोजी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हेरवाड व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती व सासऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, सासू, दीर व जाऊ यांच्याकडूनही ऋतुजाला सतत मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे संबंधित सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. तसेच गुन्ह्यात उल्लेख असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी. प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून विलंब न करता कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ऋतुजाच्या निधनानंतर परिसरात विविध सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी “Justice for Rutuja” मोहिम सुरू केली आहे. हुंडाबळीविरोधात जनजागृती करत महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. “हुंडा नको, सन्मान हवा”, “लेक वाचवा” अशा घोषणांद्वारे नागरिकांनी आवाज उठवला आहे.
याच पार्श्वभूमीवर कुंभोज येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, युवक व ग्रामस्थ सहभागी झाले. दोषींना कठोर शासन व्हावे आणि ऋतुजाला न्याय मिळावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील पोलिस तपास आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
