विद्यार्थी आंदोलनावर काँग्रेसचे राजकारण; देशाला तिसरा पर्याय हवा’ – डॉ. ॲड. संदीप ताजने

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ॲड. संदीप ताजने यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका करत देशात तिसऱ्या राजकीय पर्यायाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कथित लाठीचार्जाचा निषेध नोंदवत संसदेत निवेदन करण्याची मागणी केली.

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ॲड. संदीप ताजने यांची काँग्रेस आणि भाजपवर टीका. आंदोलनावर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत तिसऱ्या पर्यायाची गरज व्यक्त.

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. ॲड. संदीप ताजने यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय वर्चस्व मिळवून ‘राजकीय मायलेज’ घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉ. ताजने म्हणाले की, महिनाभरापासून दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात काँग्रेसने हस्तक्षेप करून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारी करण्यात आलेले आंदोलन याचेच उदाहरण असल्याचा दावा त्यांनी केला.

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामागे राजकीय हेतू असला, तरी आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला कथित लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर निषेधार्ह असून त्यामुळे केंद्र सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे, असेही त्यांनी म्हटले. या घटनेबाबत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन करून देशासमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेली मंडळी कोणत्याही एका जाती, धर्म, लिंग किंवा राजकीय पक्षाशी संबंधित नव्हती. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून देशाला आता तिसरा राजकीय पर्याय अपेक्षित असल्याचे सध्याच्या वातावरणावरून दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.

याचबरोबर अण्णा हजारे आणि सोनम वांगचुक यांनी कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली न जाता स्वतंत्र भूमिका घ्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विविध मागण्यांसाठी आंदोलन होणे हा लोकशाहीचा भाग असला, तरी आंदोलकांवर कथित अमानुष अत्याचार झाल्यास त्याविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असे ते म्हणाले.

२० जुलै रोजी दिल्लीत घडलेल्या कथित घटनांचा उल्लेख करत, त्या वेळी अत्याचारग्रस्त नागरिक भारतीय नव्हते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी यांचे वर्तनही केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला. आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या माध्यमातून कोण नवीन राजकीय समीकरण उभे करत आहे, असा प्रश्नही डॉ. ॲड. संदीप ताजने यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!