विवाह सोपा आणि कमी खर्चात करण्याचा संदेश देत जळगावमध्ये साखरपुड्याऐवजी थेट निकाह; दोन्ही कुटुंबांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत.
जळगाव : साखरपुडा आणि विवाहसोहळ्याच्या नावाखाली होणारा अवाजवी खर्च टाळून विवाह साध्या पद्धतीने करण्याचा संदेश देत जळगावमध्ये एका विवाहाचे साखरपुड्याऐवजी थेट निकाहमध्ये रूपांतर करण्यात आले. दोन्ही कुटुंबांनी घेतलेल्या या निर्णयातून साधेपणाने विवाह करण्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.
आजच्या काळात साखरपुडा, लग्नसमारंभ, विविध कार्यक्रम, महागडी लॉन्स आणि मोठ्या जेवणावळींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार वाढतो. विवाहसोहळ्यातील अनावश्यक खर्च आणि दिखावा कमी करून साधेपणाने विवाह करण्याची गरज यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी दोन्ही कुटुंबांशी संवाद साधत साध्या पद्धतीने विवाह करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर जामनेर येथील रेहान शेख रौफ यांचे कुटुंब आणि जळगाव मेहरून येथील अकील शेख खलील यांचे कुटुंब यांनी साखरपुडा समारंभ न करता थेट निकाह करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, अस्रच्या नमाजानंतर मस्जिद अल वझीर येथे निकाह सोहळा पार पडला. यावेळी मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन केले.
साखरपुडा आणि विवाहातील अनावश्यक खर्च, दिखावा व औपचारिकता टाळून साधेपणाने निकाह करण्याचा हा निर्णय समाजासाठी संदेश देणारा असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या साध्या विवाहाबद्दल दोन्ही कुटुंबांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.
“विवाह सोपा करा, व्यभिचाराला आळा घाला”
यावेळी मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी विवाहप्रसंगी होणारा अनावश्यक खर्च कमी करून विवाह प्रक्रिया सुलभ करण्याची गरज व्यक्त केली. विवाह सोपा आणि सुलभ झाल्यास विवाहासंदर्भातील सामाजिक अडचणी कमी होण्यास मदत होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
