शिडोळ येथे डिजिटल ग्रामसभा; सायबर सुरक्षेचा संदेश

शिडोळ येथे आयोजित डिजिटल ग्रामसभेत सायबर वॉरियर्सनी ग्रामस्थांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग लिंक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले.

अविष्कार कांबळे, नरेश पंडित यांच्यासह सायबर वॉरियर्सनी शिडोळ येथे ग्रामस्थांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांपासून बचावाच्या उपायांची माहिती दिली.

शिडोळ, ता. निलंगा, जि. लातूर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शिडोळ येथे अनोख्या पद्धतीने डिजिटल ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत ग्रामस्थांना ऑनलाइन फसवणूक, बनावट फोन व संदेश, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट सरकारी योजना तसेच सोशल मीडिया फसवणुकीबाबत सायबर सुरक्षेचा संदेश देण्यात आला.

डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच संशयास्पद फोन, संदेश आणि आकर्षक ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहावे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे, प्राची भोसले, पायल साबणे आणि प्राजक्ता बोरुळे यांनी सहभाग घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि सायबर फसवणुकीपासून बचावाच्या उपाययोजनांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

“ग्रामसभा डिजिटल झाली, आता प्रत्येक ग्रामस्थाची डिजिटल सुरक्षा मजबूत होणे गरजेचे आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!