मंथाले नगरमध्ये घराघरात डिजिटल सुरक्षेचे धडे

लातूरच्या मंथाले नगरमध्ये क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने घराघरात जाऊन डिजिटल सुरक्षा जनजागृती; नागरिकांना ओटीपी, सोशल मीडिया, संशयास्पद लिंक आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन.

मंथाले नगरमध्ये घराघरात डिजिटल सुरक्षेचे धडे

क्विक हील फाऊंडेशनचा उपक्रम; १० घरांमध्ये प्रत्यक्ष संवादातून सायबर सुरक्षेचा संदेश

लातूर : डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने मंथाले नगर येथे घराघरात जाऊन डिजिटल सुरक्षा जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आदित्य माने आणि साहिल जाधव यांनी परिसरातील १० घरांचा सर्वे करून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

यावेळी विशेषतः महिलांना डिजिटल सुरक्षेबाबत विविध महत्त्वाच्या बाबी समजावून सांगण्यात आल्या. अनोळखी व्यक्तींचे नंबर सेव्ह न करणे, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती आणि फोटो अनावश्यकपणे शेअर न करणे, तसेच बँकिंग व्यवहारातील ओटीपी कोणासोबतही शेअर न करणे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच खरी आणि बनावट लिंक कशी ओळखावी, संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

घरातील मुले ऑनलाइन गेम्स खेळत असल्यास पालकांनी त्यांच्या डिजिटल सवयींकडे दुर्लक्ष न करता मुले कोणते गेम खेळतात, कोणाशी ऑनलाइन संवाद साधतात आणि कोणती माहिती शेअर करतात, याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. मुलांच्या सुरक्षित डिजिटल वापरासाठी पालकांनी संवाद आणि मार्गदर्शन कायम ठेवणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

घराघरात प्रत्यक्ष संवाद साधून डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा क्विक हील फाऊंडेशनचा संकल्प या उपक्रमातून पुढे नेण्यात आला. नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत डिजिटल सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!