उमाळा परिसरातील धम्म जळगाव विपश्यना केंद्राचा विस्तार प्रकल्प सुरू; अधिक साधकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार.
जळगाव शहरातील उमाळा परिसरात कार्यरत असलेल्या धम्म जळगाव विपश्यना ध्यान केंद्रात नियमितपणे दहा दिवसीय निवासी विपश्यना शिबिरांचे आयोजन केले जात असून, या माध्यमातून देशभरातील साधकांना अध्यात्मिक साधनेची संधी उपलब्ध होत आहे. धम्म जळगाव विपश्यना केंद्र यांच्या वतीने हे शिबिर पूर्णपणे नि:शुल्क आयोजित केले जाते.
या शिबिरांमध्ये विविध जाती-धर्म, पंथ आणि पार्श्वभूमीतील साधक सहभागी होत असून, मनःशांती, आत्मपरिक्षण आणि मानसिक शुद्धीकरणासाठी विपश्यना साधनेचा लाभ घेत आहेत. विपश्यना ही प्राचीन ध्यान पद्धती असून, तिच्या नियमित साधनेमुळे मन स्थिर, शांत आणि सकारात्मक बनते, असा अनुभव अनेक साधकांनी व्यक्त केला आहे.
वाढत्या प्रतिसादामुळे केंद्राच्या विस्ताराचे नियोजन करण्यात आले आहे. नव्या प्रकल्पांतर्गत अधिक विस्तृत जागेत नवीन ध्यान कक्ष, वाढीव निवास व्यवस्था, भोजनगृह तसेच पॅगोडा उभारण्याचे नियोजन आहे. या सुविधा निर्माण झाल्यानंतर अधिकाधिक साधकांना या साधनेचा लाभ घेता येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विपश्यना साधनेचा लाभ घेतलेल्या साधकांकडून मिळणाऱ्या स्वेच्छा दानातूनच केंद्राची उभारणी आणि शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या कार्यात समाजाचा सक्रिय सहभाग दिसून येतो.
दरम्यान, बुद्ध पौर्णिमा (दि. १ मे २०२६) निमित्त सकाळी ६ ते ९ या वेळेत सामूहिक साधना व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विपश्यना संस्था जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे जळगावमध्ये अध्यात्मिक वातावरणाला चालना मिळत असून, अधिकाधिक नागरिकांनी या साधनेचा लाभ घ्यावा, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
