नांदेडमधील विधान परिषद निवडणुकीत मतदार नगरसेवकांवर दबाव किंवा प्रलोभनांचा वापर होत आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी इंजि. प्रशांत इंगोले यांनी केली.
नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार असलेल्या अनेक नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विधान परिषद निवडणूक उमेदवार तथा नांदेड-वाघाळा महानगरपालिका गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांना सादर केले.
इंगोले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड-वाघाळा महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील नगरसेवक हे विधान परिषद निवडणुकीतील अधिकृत मतदार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, मोठ्या प्रमाणावर नगरसेवक “नॉट रिचेबल” असल्याचे आढळून आले. अनेक लोकप्रतिनिधी एकाच वेळी संपर्काबाहेर असल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये मतदारांवर विविध प्रकारचे राजकीय दबाव आणणे, आर्थिक प्रलोभने देणे किंवा इतर मार्गांनी मतदानावर प्रभाव टाकण्याचे आरोप आणि चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काही नगरसेवकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे का, त्यांच्यावर मतदानासाठी दबाव टाकला जात आहे का किंवा त्यांच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेवर परिणाम होईल अशा हालचाली सुरू आहेत का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे इंगोले यांनी निवेदनात म्हटले आहे.
लोकशाही प्रक्रियेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असून, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांची परिस्थिती, त्यांचा मुक्त संपर्क आणि निवडणुकीतील सहभाग याबाबत निवडणूक यंत्रणेने तातडीने पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कायद्याच्या चौकटीत आणि पूर्णपणे निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी निवेदनाद्वारे नमूद केले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला असून, निवडणूक प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
