तोरणमाळच्या दुर्गम भागातून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला सुरुवात; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. शिक्षण हे दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असून, प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक म्हणून घडला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त आयोजित प्रवेशोत्सव-आनंदोत्सव कार्यक्रमात धडगाव तालुक्यातील दुर्गम तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मंत्री भुसे बोलत होते.
यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, मुंबईच्या उपसंचालक भावना राजनूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वंदना वळवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) चे प्राचार्य डॉ. दीपक साबळे, रमेश चौधरी, माजी शिक्षण सभापती गणेश पराडके, सीताराम पावरा, राकेश पावरा, जीवन रावतळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभरात प्रवेशोत्सव-आनंदोत्सवाचा उत्साह
शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येत असल्याचे सांगत मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा आनंद पोहोचवणे आणि शाळेशी त्यांचे नाते अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तोरणमाळचे आवासीय विद्यालय ठरत आहे आशेचा किरण
तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयाचा विशेष उल्लेख करताना मंत्री भुसे म्हणाले की, २० शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आलेले हे आधुनिक शिक्षणकेंद्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतही येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरत सुरू असून, दर्जेदार शिक्षण, निवास, पोषण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत असून, त्यांच्या भवितव्यासाठी नवे क्षितिज खुले होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक
यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल विशेष कौतुक केले. शासकीय शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त करणारा हा निर्णय असून, इतर पालकांसाठीही तो प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा जल्लोषात सहभाग
प्रवेशोत्सव-आनंदोत्सवानिमित्त विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवागत विद्यार्थ्यांचे फुलांनी, टाळ्यांच्या गजरात आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि शिक्षकांचा सहभाग यामुळे तोरणमाळच्या डोंगररांगांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात झाली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
