स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट पाणी मीटर बसविण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला असून या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपने मांडलेल्या या ठरावानंतर प्रशासनाला पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने सध्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून मिळणाऱ्या सुमारे २०० दशलक्ष लिटर पाण्यावर पुरवठा अवलंबून आहे. मात्र हा पुरवठा अपुरा पडत असल्याने भविष्यातील गरज लक्षात घेऊन सूर्या प्रकल्पातून अतिरिक्त २१८ दशलक्ष लिटर पाणी मंजूर करण्यात आले आहे. तरीही या योजनेतील पाणी प्रत्यक्ष उपलब्ध होण्याच्या वेळेबाबत अनिश्चितता कायम आहे.
सध्या उपलब्ध पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वितरणाचे वेळापत्रक आखले जात आहे. मात्र अनेक गृहनिर्माण संकुलांना अपेक्षित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी अतिरिक्त पाणी शुल्क आकारले जात असल्याचे आरोपही होत असून अनेक संकुलांतील पाणी मीटर खराब झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर पाण्याचा अचूक वापर मोजण्यासाठी आणि वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी स्मार्ट पाणी मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
ठराव मंजूर झाल्यानंतर प्रशासनाला स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरचे फायदे
स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना त्यांच्या पाणी वापराचे अचूक मोजमाप मिळू शकणार आहे. या प्रणालीतील बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने होणार असल्याने मनुष्यबळावरील खर्चातही बचत होण्याची अपेक्षा आहे. तसेच शहरातील सर्व गृहनिर्माण संकुलांना अधिक पारदर्शक आणि समान पाणी वितरण करणे महापालिकेला शक्य होईल, असा दावा उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी केला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
