मालमत्तेच्या वादातून भावजयीचा खून; दीराला जन्मठेप ;चार वर्षांनंतर निकाल; अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची, १० हजारांचा दंड

पिंप्राळा येथील योगिता सोनार खूनप्रकरणी चार वर्षांनंतर जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल; मालमत्तेच्या वादातून खून केल्याप्रकरणी दिपक लोटन सोनारला जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड.

पिंप्राळा येथील योगिता सोनार खूनप्रकरणी अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची; १७ साक्षीदारांच्या पुराव्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली.

मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेला वाद भावजयीच्या हत्येपर्यंत पोहोचलेल्या प्रकरणाचा तब्बल चार वर्षांनंतर निकाल लागला आहे. पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनीत योगिता मुकेश सोनार यांच्या खूनप्रकरणी त्यांचा सख्खा दीर दिपक लोटन सोनार याला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, मालमत्तेच्या कागदपत्रांवरून दिपक सोनार आणि त्याची भावजय योगिता सोनार यांच्यात वाद सुरू होता. २१ मे २०२१ रोजी रात्री सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या दिपकने योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गंभीर जखमी झालेल्या योगिता यांचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड घटनास्थळी फेकून तेथून पळ काढल्याचे तपासात समोर आले होते.

अल्पवयीन मुलाची साक्ष महत्त्वाची
या खूनप्रकरणाच्या सुनावणीत मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने न्यायालयात एकूण १७ साक्षीदार तपासले. पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्षी आणि पुरावे खटल्यात निर्णायक ठरले.

सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सादर केलेले साक्षी-पुरावे आणि केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने दिपक लोटन सोनार याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!