भाषा अभ्यास प्रशाळेत वृक्षारोपणाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित वृक्षारोपण उपक्रमात मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड केली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार; पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला कृतीत उतरवत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात वृक्षारोपणाच्या उपक्रमाने करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात विद्यापीठातील विविध मान्यवरांच्या हस्ते प्रशाळेच्या परिसरात आंबा, आवळा, चिकू, लिंबू यांसह विविध प्रकारच्या फळझाडे व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा. पवित्रा पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए. रवींद्र पाटील तसेच ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जी. आर. वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटणारे हरित क्षेत्र या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्ष केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी जीवनाची हमीही देतात. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचार रुजविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला हिंदी विभागप्रमुख प्रा. सुनील कुलकर्णी, डॉ. दीपक खरात, डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. प्रीती सोनी, प्रतिभा गलवाडे, संशोधक विद्यार्थी खेमराज पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरत पालोदकर, अश्विन बारी, अमोल कोळी आदी उपस्थित होते. याशिवाय एम.ए. मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षारोपणात प्रत्यक्ष योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे डॉ. दीपक खरात यांनी केले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पासह झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

विभागाचे डॉ. दीपक खरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!