सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी मार्गदर्शन व चर्चासत्र उत्साहात संपन्न ;सरस्वती माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी व डिजिटल गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सरस्वती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले. ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, पासवर्ड, फिशिंग, क्यूआर कोड स्कॅम आणि डिजिटल गोपनीयतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सरस्वती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वापर, डिजिटल गोपनीयता आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाच्या उपायांची माहिती देण्यात आली.

 सरस्वती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत हे सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या मार्गदर्शन सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर आणि खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. बदलत्या डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

मार्गदर्शनादरम्यान ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, बनावट लिंक, क्यूआर कोड स्कॅम यांसारख्या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच कोणत्याही व्यक्तीस ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

यासोबतच मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication) वापरणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करणे आणि अज्ञात लिंकवर क्लिक न करणे याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर बुलिंग आणि डिजिटल गोपनीयतेवरही चर्चा

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन डिजिटल वापराशी संबंधित सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता आणि अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क याबाबतही चर्चा करण्यात आली. मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना अधिकृत स्रोतांचा वापर करणे, अॅपला देण्यात येणाऱ्या परवानग्यांची तपासणी करणे आणि संशयास्पद डिजिटल व्यवहारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे देत सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंचे स्पष्टीकरण केले.

सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा संकल्प

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचा तसेच सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प केला.

या मार्गदर्शन व चर्चासत्रासाठी सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!