मजबूत पासवर्ड, OTP सुरक्षा, सोशल मीडिया गोपनीयता आणि अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचा संदेश राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आला.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत निर्माण होणारे सायबर धोके लक्षात घेता राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परमेश्वर पांढरे यांनी लाईव्ह हॅकिंगच्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना कोणत्या पद्धतीने लक्ष्य करू शकतात, याची प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. फिशिंग लिंक, बनावट वेबसाइट, OTP फसवणूक, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग, बनावट कॉल तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या सायबर धोक्यांबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून डिजिटल जगतात केलेली एखादी छोटीशी चूकदेखील मोठ्या सायबर धोक्याला कारणीभूत ठरू शकते, हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून दाखवून देण्यात आले. त्यामुळे अनोळखी लिंक, वेबसाइट किंवा संदेशांबाबत सावध राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. परमेश्वर पांढरे यांनी मजबूत पासवर्ड वापरणे, OTP व पासवर्ड कोणाशीही शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, सोशल मीडिया अकाउंटची गोपनीयता योग्य प्रकारे राखणे आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहणे याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले.
“तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांची अधिक प्रभावी जाणीव झाली. ‘सतर्क रहा, सुरक्षित रहा’ हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
