रिटायर झालो… पण पर्मनंट नाही झालो… असा हा शिक्षक दिन

शिक्षक दिनाच्या निमित्ताने विनाअनुदानित शिक्षक आणि प्राध्यापकांच्या नोकरी, आर्थिक परिस्थिती व संघर्षावर भाष्य करणारा प्रा. सुदर्शन किशनराव शेळके यांचा विशेष शब्दलेख.

शिक्षक समाज घडवतात; मात्र त्यांच्या वाट्याला अस्थिर नोकरी, कमी मानधन आणि आर्थिक संघर्ष का? ‘रिटायर झालो… पण पर्मनंट नाही झालो…’ विशेष शब्दलेख.

प्रा. सुदर्शन किशनराव शेळके, श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय, वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली.

मो. नं. ९८२२६४४७८१.

५ सप्टेंबर हा दिवस सगळीकडे शिक्षक दिन म्हणून सर्व शाळा व कॉलेजमध्ये साजरा केला जातो. त्या दिवशी एक प्रकारे शिक्षकांचा सन्मानच म्हणावा लागेल. शिक्षक हे वेगवेगळ्या रंगीबेरंगी पोशाखामध्ये, सूट-बूटामध्ये त्या दिवशी शाळेत उपस्थित राहतात. एक आगळावेगळा आनंद त्यांच्या मनामध्ये असतो. सोबतच विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव ते स्वीकारत असतात. त्यांना सर म्हटले की, एक आदराची भावना निर्माण होते. सर या शब्दाने तो भारावून जातो.

शिक्षक हा केवळ शिक्षण व्यवस्थेतील एक घटक नसून समाजाच्या भवितव्याला आकार देणारा शिल्पकार आहे. शिक्षक हे आपली भूमिका निभावताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावणे, अभ्यासात रुची निर्माण करणे, विविध मार्गदर्शन करणे हे आपले कर्तव्य समजतात. समाजामध्ये शिक्षकाला एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आरशाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रतिबिंब निर्माण करतो. आणि त्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत असतात. त्यांचे जीवन प्रकाशमय व तेजोमय होत असते. विद्यार्थ्यांना ते एक नवसंजीवनी देतात.

शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. २००५ पासून शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरण झाले, तेव्हापासूनच शिक्षकांमध्ये शिक्षण सेवक हे पद तयार झालेले दिसून येते. पदवी शिक्षणामध्ये तासिका तत्वाबर (तात्पुरत्या स्वरूपातील प्राध्यापक) प्राध्यापक पद भरले जाते.

शिक्षक हा सर्वच क्षेत्रामध्ये सर्व गुण संपन्न असतो म्हणून त्यांना शासनाची अनेक कामे करावी लागतात. मतदार यादी, जनगणनेची कामे, शाळेतील खिचडी वाटपाची कामे, यु-डाइस प्लस, ऑनलाइनची कामे, माझी शाळा सुंदर शाळा, विविध समित्या नेमणे, असे विविध उपक्रम किंवा कामे हे शिक्षकांच्या माथी लावली गेली आहेत. सोबतच गावातील राजकारण्यासोबत बसून गावाचा विकास करायचा हे सुद्धा शासनाला अभिप्रेत आहे.

पण आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उदासीनता निर्माण झालेली दिसून येते. शासनाच्या धोरणामुळे कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, व अनुदानित अशी शाळा व महाविद्यालये आहेत. त्यामध्ये काम करणारे हजारो शिक्षक बांधव आहेत. पण प्रत्येक शिक्षकांना मानधन हे वेगवेगळ्या स्वरूपात मिळत असते. यामध्ये विषमता आढळून येते.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना तर तुटपुंज्या पगारावर काम कराबे लागते. त्यांना पगार कमी आणि कामे जास्त असतात. त्यांना नाविलाजाने अध्यापनाचे कार्य करावे लागते. आज बऱ्याच शिक्षक बांधवांना आपला उदरनिर्वाह भागवणे मुश्किल होऊन गेले आहे. आज ना उद्या शाळा व कॉलेज यांना अनुदान येईल, या अशी पोटी ते काम करत असतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य तसेच निघून जाते. त्यांना पगार कमी मिळतो तरीही ते नोकरी करीत असतात.

बिनाअनुदानित धोरणामुळे तर बऱ्याच शिक्षक बांधवांचे आयुष्य उध्वस्त झालेले दिसून येते. विनाअनुदानित धोरणात तर टप्प्याटप्प्याने अनुदान येत असते. जसे की, २०%, ४०%, ६०%, ८०%, व १००% असा अनुदानाचा टप्पा असतो. त्यातही हे अनुदान टप्पा घेण्यासाठी आमच्या शिक्षक बांधवांना ऊन पाण्यात तानभूक हरवून आझाद मैदानावर आंदोलन करावे लागते. १००% अनुदान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष अटळच असतो. आणि तर कुटुंब उपाशी राहते.

ह्यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे मराठवाडा, विदर्भातील टक्के बारीच्या महाविद्यालयात संस्थाचालकांची लाखो कोटींची रक्कम संस्था विकासाच्या नावाखाली घेतातच, त्याचे हप्तेफेडण्यात हा टक्केवारीचा पगार जाते. ८-१० वर्ष हप्ते फेडण्यात निघून जातात. तेव्हा कुठे शासनाचे आश्वासन मिळत असते. अनुदानाचा टप्पा येतो तेव्हा संस्थाचालकाकडून पैशाची मागणी केली जाते. आणि पैसे नसतील तर त्यांना नोकरीवर घेतले जात नाही. जो कोणी जास्त पैसे देईल, त्याचाच विचार करण्यात येतो.

शिक्षक हा फक्त आशेबरच आपले जीवन जगत असतो. आज ना उद्या आपण परमनंट होऊ व आपल्या कुटुंबाला व मुलाबाळांना सुखसुविधा पुरवू एवढीच त्यांची अपेक्षा असते. गाडी, बंगला, मोटरसायकल हे तर त्यांचे स्वप्न राहूनच जाते. ह्या स्वप्नापेक्षा आजच्या तरुणाचे विवाह होतील ह्याच कारणासाठी लाखो रुपये द्यायला आईवडील आणि सासु सासरे तयार होतात. जर मुलगा नोकरीला असेल तर सुनेसाठीसुद्धा हे तत्व लागू पडते.

ह्यापुढील भयावह स्थिती म्हणजे आज आमच्या शिक्षक बांधवांचे दिवसेंदिवस वय वाढत जात आहे. त्यांना अनेक समस्यांना बळी पडावे लागत आहे. परमनंट नोकरी नाही म्हणून त्यांचा विवाहसुद्धा होत नाही. आपण पर्मनंट नोकरीला लागलो की धुमधडाक्यात विवाह करू ही त्यांची अपेक्षा असते, पण बऱ्याच जणांचे असे होत नाही. त्यांना नोकरी म्हणजे क्षितिज बाटेत. त्यांना पगार कमी म्हणून मुलीचे आई-वडील आपली मुलगी द्यायला तयार नसतात. मुलीच्या आई-वडिलांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. नोकरी नाही तर छोकरी नाही अशी धरणा झालेली दिसून येते.

आमचे शिक्षक बांधव हे एका खोट्या बेगडी प्रतिष्ठेमुळे स्वतःचे शोषण करून घेत असताना दिसून येत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची नोकरी आहे, असेच म्हणावे लागेल. कारण आजच्या घडीला शासनाने पवित्र पोर्टल सुरू केले आहे. त्यातून बरेच शिक्षक हे पर्मनंट नोकरीला लागतही आहेत. पण संस्थाअसलेल्या शाळा कॉलेजमध्ये बऱ्याच शिक्षकांना पोर्टलच्या माध्यमातूनही त्यांना पैसे द्यावे लागत आहेत. एखाद्याचा वशिला, एखाद्याच्या जवळचा नातेवाईक असेल, तर त्याचाच विचार करण्यात येतो.

समाजामध्ये शिक्षकाला मान प्रतिष्ठा मिळत असते, त्यांचा आदर सन्मान केला जातो. पण शिक्षकावर अशी वेळ येते की, त्याला कर्ज काढून सण उत्सव साजरे करावे लागतात व कर्जबाजारी व्हावे लागते. एक तर पगार कमी आणि कुटुंबातील सदस्य जास्त यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडतो. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत असतो.

सध्या तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या आत्महत्येचे प्रमाण बाढलेले आढळून येते. अशी उदाहरणे आपण वर्तमानपत्रे, दूरदर्शन, फेसबुक, बावर आपण पाहत असतो. आजच्या घडीला शिक्षकांची अशी दुरावस्था झालेली दिसून येते की,

माय जेवायला वाढत नाही, बाप भिक मागु देत नाही..

अशी अवस्था आमच्या शिक्षक बांधवांची झालेली आहे. आज अनेक पदव्या घेऊन आमचे शिक्षक बंधू बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेली दिसून येतात. एम.ए., नेट, सेट, पीएचडी, व चार चार विषयात सेट नेट.. बी.एड., डी.एड. असुन, ताण तणाबात जीवन जगत असताना दिसून येतात.

आज आम्हाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, समानता, हक, न्याय, मिळत नाही. एकीकडे आपला भारत देश महासत्ताक बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आणि जे शिक्षक आपल्या राष्ट्राची पिढी घडवू पाहत आहेत. अशाच शिक्षकांना अनेक योजनापासून व विविध अशा सेवापुर्तीपासून वंचित राहावे लागत आहे.

आज कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मानव विकास योजनेअंतर्गत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या अनेक शिक्षक बंधू भगिनींना ह्या नोकरीपासून मुकावे लागले. त्यांचे आयुष्य धोक्यात आले.

आजची वास्तव परिस्थिती पाहता महाविद्यालयीन प्राध्यापक भरती संदर्भात प्राध्यापक होऊ पाहणाऱ्या बऱ्याच प्राध्यापक बंधूंना शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पैशाच्या अभावी त्या पदापासून दुर राहावे लागत आहे. दैनंदिन लोकसत्ता मधील वृत्तानुसार चंद्रपूर येथील महाविद्यालयात १.२५ कोटी मागितल्याची बातमी प्रकाशित झाले. कोटी रुपये द्यायचे आणि गुलामी करायची. त्यातही प्राध्यापकांचा पगारावर सगळे चर्चा करतात.

आमचे शिक्षक बंधू हे संपूर्ण आयुष्य खडू, फळा व पुस्तक यामध्ये घालवले आहे. पण शासनाच्या काही जाचक नियम व अटीमुळे आज ते रिटायर झाले. म्हणूनच अशी म्हणण्याची वेळ आली आहे की,

रिटायर झालो… पण पर्मनंट नाही झालो… असा हा शिक्षक दिन.”

अशाप्रकारे आमचा हा शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!