राजर्षी शाहू महाविद्यालय आणि क्विक हिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने लातूरमध्ये सायबर जनजागृती सत्र; फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्काचे आवाहन.
लातूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन जगतात सजग आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या जनजागृती उपक्रमांतर्गत ट्युशन एरिया, लातूर येथील विद्या आराधना अकॅडमी येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सायबर वॉरिअर नरेश पंडित, अविष्कार कांबळे आणि श्रेयश माकणे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, ओटीपी सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, सोशल मीडिया सुरक्षा तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी कोणत्या बाबी तपासाव्यात, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये तसेच सोशल मीडिया वापरताना गोपनीयतेची काळजी कशी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांद्वारे माहिती देण्यात आली.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी, मजबूत पासवर्ड आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. डिजिटल दुनियेत एका चुकीच्या क्लिकमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सावधगिरी आणि जागरूकता हीच प्रभावी सुरक्षा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
