महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप; उद्यापासून कारवाईचे आदेश; उपमहापौर, सभापती, अधिकाऱ्यांसह केली पाहणी ; महात्मा फुले यांचा पुतळा अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश

महात्मा फुले मार्केट परिसरात पाहणी करत महापौर दीपमाला काळे यांचे आदेश; अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित करण्यासाठी प्रशासन सज्ज.

अतिक्रमणमुक्त फुले मार्केटसाठी प्रशासन सज्ज; दुकानदारांना इशारा, स्वच्छता व पार्किंग सुधारण्यासाठी उपाययोजना.

 शहर महानगरपालिकेच्या महात्मा फुले मार्केट परिसरातील वाढत्या समस्या आणि अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवार, ५ मे रोजी दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष पाहणी करत धडक कारवाईचे आदेश दिले. व्यापारी असोसिएशनकडून निवेदन प्राप्त झाल्यानंतर हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

या दौऱ्यात उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, उपायुक्त पंकज गोसावी, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि हॉकर्स असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याभोवती झालेल्या अतिक्रमणावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पुतळे अतिक्रमणमुक्त असले पाहिजेत,” असे स्पष्ट करत त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सेंट्रल फुले मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यक असल्यास पोलिस बंदोबस्त घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

अनधिकृत वायरिंग आणि शेड हटवणार

मार्केटमधील अनधिकृत वीज जोडण्या तात्काळ तोडण्याचे आदेश देण्यात आले असून अवैध ताडपत्री व ग्रीन शेडनेट हटवण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यावर ठेवलेल्या जड पेट्याही उचलण्याचे निर्देश देण्यात आले.

दुकानदारांना इशारा

विनापरवाना हॉकर्सना जागा देणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला. मार्केटमध्ये नोंदणीकृत २००-३०० हॉकर्स असताना प्रत्यक्ष संख्या हजाराच्या घरात पोहोचल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हॉकर्ससाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

स्वच्छता व सुविधा सुधारण्यावर भर

मार्केटमधील बंद शौचालये सुरू करून स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक दुकानासमोर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून कचरा व्यवस्थापनासाठी सकाळी घंटागाडीची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच पार्किंगसाठी जागा मोकळी ठेवणे आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, काही नागरिकांनी हॉकर्सना पैसे घेऊन जागा देण्यात येत असल्याचा आरोप केला असून याबाबत पुराव्यासह तक्रार करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

महापौर दीपमाला काळे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, फुले मार्केट परिसर अतिक्रमणमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!