उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल दि. 08 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार.

महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल 2026 उद्या घोषित होणार असून विद्यार्थ्यांना DigiLocker सह विविध संकेतस्थळांवर निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विविध अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.

निकाल कुठे पाहता येणार?

विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे :

  • Maharashtra Board Official Website
  • SSC Result Portal
  • Results DigiLocker
  • Target Publications Results
  • Navneet Results

तसेच काही वृत्तसंस्था आणि शैक्षणिक पोर्टलवरही निकालाची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध

निकालानंतर विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित गुण ऑनलाइन पाहता येणार असून गुणपत्रिकेची प्रिंटआउट प्रत देखील डाउनलोड करता येणार आहे. याशिवाय DigiLocker App वर विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शाळांना त्यांच्या लॉगिनद्वारे एकत्रित निकाल पाहण्याची सुविधा मंडळाकडून देण्यात आली आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज

निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मंडळाच्या माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून शुल्क Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन

निकाल जाहीर होताच संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी संयम राखून अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल पाहावा, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, दहावीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, शाखा निवड आणि करिअर नियोजनासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!