धरणगावातील अंजनी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणात महसूल विभाग सतर्क; शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंद.
धरणगाव तालुक्यातील बाबुळगाव परिसरात अवैध वाळू माफियांनी अंजनी नदी पात्रावर अक्षरशः धुडगूस घातल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बाबुळगाव येथील अंजनी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी दीपक विजयसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक MH-19 EA-6810 मधून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे, नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाळू माफियांच्या अशा बेकायदेशीर कारवायांमुळे नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात येत असून भूजल पातळी घसरत आहे. याचा थेट फटका शेतकरी, पर्यावरण आणि भविष्यातील पाणीटंचाईला बसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकरणी समाधान विठ्ठल पाटील (रा. धरणगाव) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२ तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना ५८५ जितेंद्र भदाणे करीत आहेत.
दरम्यान, महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना स्पष्ट इशारा मिळाला असून, नदीपात्रांची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.

करण शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे प्राधिनिधी असून बातम्या आणि जाहिरातींकरीता संपर्क करावा-
✍️ करण (गुरू) शिंदे -8983956862
ईमेल- journalistgurubaba@gmail.com
