जळगाव आर्थिक घोटाळा प्रकरणात TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखा प्रमुखास अटक. २३.८१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू.
जळगावमध्ये मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल २७९ गुंतवणूकदारांची सुमारे २३ कोटी ८१ लाख रुपयांहून अधिक रक्कम लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ‘TWJ असोसिएट्स’च्या जळगाव शाखेचा प्रमुख मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१) याला अटक केली आहे.
तपासात असे समोर आले आहे की, सुरुवातीला तक्रार करणारा मिलिंद पाटीलच या संपूर्ण घोटाळ्यात सहभागी होता. तो फ्रेंचायझी म्हणून जळगाव शाखा चालवत होता आणि गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारणे, करार करणे तसेच कमिशन मिळवणे यात त्याचा थेट सहभाग होता.
डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात सेमिनार आयोजित करून लोकांना आकर्षित करण्यात आले. सेबीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ११ महिन्यांत जास्त नफ्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र मुदत संपल्यानंतर परतावा न देता फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भारतीय न्याय संहिता तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे.
कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांच्यावरही राज्यातील विविध शहरांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच जळगाव पोलिस त्यांच्या ताब्यात घेणार आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असून, ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत त्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
