लोककल्याणकारी राज्यकर्ती, समाजसुधारक आणि राष्ट्रमाता : लोकमाता अहिल्याबाई होळकर

३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे जन्मलेल्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, समता, सर्वधर्मसमभाव आणि लोककल्याणाच्या मूल्यांवर आधारित आदर्श राज्यकारभार घडवून भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळविले.

सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाचा आदर्श घालणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची सविस्तर माहिती व विशेष लेख.

भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी राजे-राण्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला आहे. मात्र, प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत न्याय, समता, मानवता आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर राज्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अद्वितीय आहे. ज्या मनगटात बळ, बुद्धी, दूरदृष्टी आणि चातुर्य असते, तोच लोकाभिमुख राजा किंवा राज्यकर्ती होऊ शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर.

सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक एकात्मता, स्त्री-पुरुष समानता, गोरगरीबांविषयीची आस्था, हुंडा प्रथेचा विरोध, अनिष्ट रूढी-परंपरांचा बिमोड, दत्तक वारसाहक्काची मान्यता आणि प्रजेप्रती असलेली तळमळ या गुणांमुळे अहिल्याबाई केवळ राज्यकर्ती राहिल्या नाहीत, तर त्या एक महान समाजसुधारक म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या.

जन्म आणि बालपण

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई शिंदे हे धनगर समाजातील होते. आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असूनही माणकोजी शिंदे हे विद्वान, विचारवंत आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्व होते.

त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. तरीही माणकोजी शिंदे यांनी आपल्या कन्येला शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला. घरीच शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा मजबूत पाया घातला. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत वडिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.

होळकर घराण्यातील प्रवेश

अवघ्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी २० मे १७३३ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात मोठ्या थाटामाटात झाला.

विवाहानंतर आपल्या शांत, संयमी, कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी होळकर कुटुंबातील सर्वांची मने जिंकली. त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली.

शिक्षण, प्रशिक्षण आणि राजकारणाची तयारी

मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेतील असामान्य गुण ओळखले होते. पुरुषप्रधान संस्कृतीच्या त्या काळात त्यांनी अहिल्याबाईंना केवळ घरगुती कामांपुरते मर्यादित न ठेवता प्रशासन, राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण दिले.

मोडी लिपी, लेखन-वाचन, गणित, पत्रव्यवहार, न्यायनिवाडा, प्रशासन यांसह घोडेस्वारी, शस्त्रविद्या, दांडपट्टा, युद्धनीती आणि लष्करी डावपेच यांचेही प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. यामुळे त्यांची सामाजिक आणि राजकीय समज अधिक परिपक्व झाली.

वैधव्य आणि धैर्याचा आदर्श

इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या युद्धात खंडेराव होळकर यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अहिल्याबाईंवर वैधव्य आले.

त्या काळात विधवांनी सती जाण्याची प्रथा समाजमान्य मानली जात होती. परंतु अहिल्याबाईंनी या रूढीला ठामपणे नकार दिला. समाजाची टीका, अपमान आणि चारित्र्यावर होणारे आक्षेप यांची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी सती न जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या मते, “सती जाऊन स्वर्ग मिळेल की नाही हे माहीत नाही; पण जिवंत राहिले तर लाखो प्रजाजनांचे जीवन सुखी करता येईल.” या विचारातून त्यांनी स्वतःचे जीवन प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केले. हा निर्णय त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचा आणि अद्वितीय मनोधैर्याचा पुरावा आहे.

दुःखावर मात करून उभारलेले आदर्श राज्य

अहिल्याबाईंच्या आयुष्यात एकामागून एक संकटे आली. २० मे १७६६ रोजी मल्हारराव होळकर यांचे निधन झाले आणि त्यानंतर २७ मार्च १७६७ रोजी पुत्र मालेराव यांचाही मृत्यू झाला.

तरीही त्यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्यकारभार हाती घेतला. तब्बल २९ वर्षे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राज्य केले. धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित कल्याणकारी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली.

रघुनाथराव पेशव्यांना दिलेले प्रत्युत्तर

मल्हाररावांच्या निधनानंतर पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा मोह झाला. त्यांनी होळकरांचे राज्य पेशवाईत विलीन करण्यासाठी मोठ्या सैन्यासह इंदूरवर चाल केली.

ही बातमी समजताच अहिल्याबाई घाबरल्या नाहीत. उलट त्यांनी रघुनाथरावांना कठोर शब्दांत खलिता पाठवून युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला.

त्या म्हणाल्या की, “मला अबला समजू नका. प्रसंगी मी स्वतः रणांगणात उतरून भाला हातात घेईन. जर मी हरले तर माझी कीर्ती वाढेल; पण तुम्ही हरलात तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.”

या ठाम भूमिकेमुळे त्यांचे धैर्य, मुत्सद्देगिरी आणि स्वाभिमानी नेतृत्व अधोरेखित होते.

लोककल्याणाचा अखंड ध्यास

अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ आपल्या राज्यापुरता विचार न करता संपूर्ण भारताच्या विकासासाठी कार्य केले.

त्यांनी देशभर विहिरी, तलाव, घाट, कुंड, धर्मशाळा, पूल आणि रस्ते बांधले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्या काळात जे कार्य आज सार्वजनिक बांधकाम विभाग करतो, त्याप्रमाणे व्यापक विकासकामे त्यांनी केली.

उद्योग, व्यापार आणि रोजगाराला चालना

राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवून त्यांनी त्या शहराला सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र बनवले. विणकर, कारागीर, कलाकार, साहित्यिक आणि मजूर यांना जमीन, निवास आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले.

त्यांच्या प्रोत्साहनामुळे महेश्वरी साड्या, पैठणी आणि इतर वस्त्रोद्योगांना मोठी चालना मिळाली. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाली आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.

पर्यावरण आणि प्राणीमात्रांप्रती संवेदनशीलता

अहिल्याबाईंनी पर्यावरण संवर्धनालाही महत्त्व दिले. पशुपक्ष्यांसाठी कुरणे राखली. प्रवाशांसाठी मार्गांवर वृक्षारोपण, आंबराया, बागा, विश्रांतीस्थळे आणि धर्मशाळा उभारल्या.

मुंग्यांना साखर, माशांना कणकेचे गोळे, उन्हाळ्यात पाणपोया आणि हिवाळ्यात गरजूंना उबदार वस्त्रांची व्यवस्था करून त्यांनी सर्व सजीवांविषयी करुणाभाव जपला.

समाजसुधारणेचे धाडसी कार्य

अहिल्याबाईंच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे समाजसुधारणेतील योगदान.

त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या शूरवीराशी स्वतःच्या कन्या मुक्ताबाईचा आंतरजातीय विवाह लावून त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला.

धर्मातील रूढी-परंपरांचा आंधळेपणाने स्वीकार न करता त्यांनी मानवतेला सर्वोच्च स्थान दिले. त्यांचा खरा धर्म म्हणजे “मानवताधर्म” होता.

सर्वधर्मसमभावाचा आदर्श

अहिल्याबाईंनी केवळ मंदिरेच बांधली नाहीत, तर मशिदी, दर्गे, विहार आणि इतर धार्मिक स्थळांनाही मदत केली. सर्व धर्मांतील लोकांना समान वागणूक देत त्यांनी धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला.

लोकमाता अहिल्याबाई होळकर या केवळ एका संस्थानाच्या राणी नव्हत्या; त्या खऱ्या अर्थाने जनतेच्या माता होत्या. प्रजेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, सामाजिक न्यायाला प्राधान्य देणाऱ्या, विकासकामांद्वारे लोकजीवन समृद्ध करणाऱ्या आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्या एक महान राष्ट्रनिर्माती होत्या.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला, प्रगतिशील विचारांना आणि मानवतावादी दृष्टिकोनाला विनम्र अभिवादन. त्यांच्या जीवनातून समाजसेवा, न्याय, समता आणि लोकहिताचा आदर्श प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!