कारगिल विजय दिवस म्हणजेच राष्ट्रीय एकता व अखंडता दिवस

कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अद्वितीय शौर्य, सर्वोच्च बलिदान आणि राष्ट्रनिष्ठेला कृतज्ञ अभिवादन. कारगिल विजय दिवस हा संपूर्ण राष्ट्राच्या एकात्मतेचा, अखंडतेचा आणि देशभक्तीचा प्रेरणादायी दिवस आहे.

कारगिल युद्धातील भारतीय सैन्याचा पराक्रम, नागरिकांचे योगदान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश उलगडणारा सविस्तर विशेष लेख. शहीद जवानांना विनम्र अभिवादन.

कारगिल विजय दिवस हा दिवस कारगिल युद्धात लढलेल्या जवानांच्या स्मरणार्थ विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच याला कारगिल विजय दिवस असे म्हणतात.

कारगिल युद्ध २६ जुलै १९९९ रोजी झाले. म्हणजे आज या युद्धाला बरोबर २७ वर्षे पूर्ण होत आहेत. हे युद्ध आधी ‘ऑपरेशन विजय’ या नावाने सुरू झाले. ते जवळजवळ ६० दिवस कारगिल क्षेत्रात चालले. भारतीय जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत “प्राण जाये पर वचन न जाये” या भावनेने लढत राहून अखेरीस विजय मिळवला आणि राष्ट्राभिमान, त्याग व निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली.

या युद्धात भारताचे ५०० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. त्यांच्या या असीम शौर्याला शतशः नमन. या युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे आणि कॅप्टन योगेंद्रसिंग यादव यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले धाडस आजही तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. परिस्थिती पाहून निर्णय कसे घ्यावेत आणि त्यावर मात कशी करावी, हे त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकता येते.

आपल्याला माहीत पाहिजे की कारगिल हे शहर कोणत्या ठिकाणी आहे. भौगोलिक दृष्ट्या लेह-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कारगिल वसलेले आहे आणि हाच रस्ता कारगिल युद्ध होण्याचे प्रमुख कारण ठरला. कारण पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या जवळील खोऱ्यांमध्ये अनेक घुसखोर व दहशतवाद्यांनी प्रवेश केला होता. कारगिलजवळील अनेक भागांत आपल्या लष्कराच्या चौक्या अतिशय उंचीवर असल्याने हिवाळ्याच्या महिन्यांत तेथे सैन्य तैनात ठेवणे अत्यंत अवघड असते. त्या ठिकाणी सैनिक जास्त काळ राहू शकत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ वितळल्यानंतर व हवामान अनुकूल झाल्यावर भारतीय सैन्य पुन्हा आपल्या चौक्यांवर परतत असे.

परंतु ऐन हिवाळ्यातच भारतीय लष्कराच्या काही चौक्यांवर पाकिस्तानी घुसखोर व सैनिकांनी ताबा मिळवला आणि तिथेच कारगिल युद्धाची ठिणगी पडली. अनेक भाग पाकिस्तानच्या लष्कराच्या रडारवर आले आणि आजूबाजूचा परिसर तोफगोळ्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आला. या पद्धतीने त्या चौक्यांवर पाकिस्तानी दहशतवादी व सैनिकांचे नियंत्रण आले. त्यानंतर भारतीय सैनिकांनी या घटनेचा चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. जी भूमी मुळातच आपल्या देशाची आहे, त्या भूमीचा एक इंचही भाग कोणत्याही शत्रूराष्ट्राला देता कामा नये, अशी शपथ सैनिकांनी घेतली. त्यानंतर विविध युद्धनीती आणि कौशल्याचा वापर करून भारतीय सैनिकांनी अथक परिश्रम, असीम शौर्य आणि त्यागाच्या बळावर अभिमानास्पद विजय मिळवला.

खरंतर कारगिल विजय हा सैनिकांच्या पराक्रमाचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या कर्तव्यभावनेचाही विजय आहे. कारगिल युद्धाचा उल्लेख जेव्हा-जेव्हा होतो, तेव्हा-तेव्हा हिमालयाच्या उंच शिखरावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवणारे भारतीय सैनिक डोळ्यांसमोर उभे राहतात. त्यांच्या शौर्याला, त्यागाला, राष्ट्रभक्तीला आणि राष्ट्रनिष्ठेला संपूर्ण देश आजही अभिमानाने व कृतज्ञतेने वंदन करतो.

हा विजय संपूर्ण राष्ट्राच्या एकात्मतेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा आहे. भारतीय जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामागे संपूर्ण देशाच्या अखंड एकतेची साथ ही सर्वात महत्त्वाची होती. देशभरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी थोडे-थोडे पैसे जमा करून सैनिक कल्याण निधीसाठी विविध प्रकारची आवश्यक सामग्री उपलब्ध करून दिली. अनेक नागरिकांनी रक्तदान केले, महिलांनी सैनिकांसाठी उबदार कपडे विणले, तर हजारो नागरिकांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांना पत्रे लिहून त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवला. उद्योग, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य कुटुंबांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

याहूनही महत्त्वाचे योगदान भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिले, तर कारगिल सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचे होते. कारगिल आणि लडाख परिसरातील अनेक नागरिकांनी भारतीय सैन्याला डोंगराळ भागातील गुप्त मार्ग दाखवले, आवश्यक माहिती पुरवली, सामान वाहून नेण्यात मदत केली आणि प्रतिकूल परिस्थितीत सैन्याच्या मोहिमांना सहकार्य केले. युद्ध जिंकण्यासाठी बंदुकीइतकीच महत्त्वाची असते ती विश्वासाची साथ, आणि ती साथ भारतीय नागरिकांनी त्या वेळी दिली. ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे.

आजही कारगिल युद्ध आजच्या पिढीला एक महत्त्वाचा संदेश देते. राष्ट्रभक्ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात राष्ट्रहिताला प्राधान्य देणे, संविधानाचा सन्मान करणे, कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, समाजात शांतता व सौहार्द राखणे, संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान करणे, हे प्रत्येक भारतीयाचे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

सीमेवर उभा असलेला सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता लढत असतो. तो लढतो आणि लढणारच, कारण त्याला खात्री असते की त्याच्यामागे १४० कोटी भारतीय ठामपणे उभे आहेत. ही भावना कधीही कमी होता कामा नये. राष्ट्र मजबूत करण्याची जबाबदारी केवळ सैन्याची किंवा सरकारची नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची आहे.

कारगिल विजय दिन हा केवळ भूतकाळातील पराक्रमाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्यासाठी संकल्प करण्याचाही दिवस आहे. देशाच्या सीमा सैनिक सांभाळतात; पण राष्ट्राचे भविष्य नागरिक घडवतात. देशांतर्गत आव्हाने, फुटीरतावाद, जातीयवाद, संघर्षवाद आणि भाषावाद हे देशाला अधोगतीकडे नेणारे विषय आहेत. या मुद्द्यांच्या आडून भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ओळखणे आणि त्यांना वेळेत थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अशा या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांना विनम्र अभिवादन!

जय हिंद… जय भारत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!