सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्याचे आश्वासन दिले.
शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर नागरिकांनी काढलेल्या जनआक्रोश मोर्चानंतर नगरपरिषद प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांनी केले होते.
नगरपरिषद मलकापूरच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या पत्रात नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या या पत्रामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आली आहे.
पत्रानुसार, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा, वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींचा विचार करून पुढील ४५ ते ५० दिवसांत शहरातील पाणीपुरवठ्याचे चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांपर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या निधीतून किंवा उपलब्ध अन्य निधीतून शहराबाहेरील भागांसाठी कोणतीही नवीन पाईपलाईन अथवा वाढीव कामे न करता, विद्यमान वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, पाणीपुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप खरेदी आणि आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र यासाठी तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, खरेदी आदेश आणि स्थापना कार्यवाही पूर्ण होण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नवीन पंप कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्याची कार्यक्षमता वाढून वितरणाचे अंतर आणखी कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जनआक्रोश मोर्चादरम्यान उपस्थित झालेल्या तीव्र प्रश्नांनंतर नगरपरिषद प्रशासनाने प्रथमच लेखी भूमिका स्पष्ट केल्याने या आश्वासनांच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
“आश्वासन नव्हे, कृती हवी”
नगरपरिषदेकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्याचे स्वागत केले असले तरी नागरिकांनी आता प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मलकापूरकरांच्या दृष्टीने हे आश्वासन कितपत परिणामकारक ठरते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
