अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावेळी वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेसचे आंदोलन; जंतरमंतर घटनेचा निषेध

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावेळी दिल्लीतील जंतरमंतर विद्यार्थी आंदोलनातील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात आंदोलन केले. दुसरीकडे अमित शाह यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहत अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन केले.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आलेल्या अमित शाह यांनी अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन केले, तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसने दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात आंदोलन केले. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असून, त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात आंदोलनासाठी परवानगी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

काँग्रेसने आरोप केला की, जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. आंदोलन संपल्यानंतरही आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना ताब्यात घेणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा पक्षाने केला. त्याच्या निषेधार्थ अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही त्याच ठिकाणी प्रतिआंदोलनाची चर्चा होती. मात्र, भाजपने कोणतेही आंदोलन केले नाही. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.

अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे तसेच आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!