एफडीएने जोगेश्वरीतील सौंदर्यप्रसाधन विक्रेत्यावर कारवाई करत वैधानिक लेबल नसलेला साबण जप्त केला. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जोगेश्वरी (पश्चिम) येथील मेसर्स जे. के. सोप बाजार या आस्थापनावर १४ जुलै रोजी छापा टाकून सुमारे १० लाख ९३ हजार ६८२ रुपये किमतीचा विनालेबल साबण जप्त केला. या प्रकरणी आस्थापनाचे मालक नबी उल्लाह यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, साबणाचे दोन नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
एफडीएच्या मुंबई पथकाने पटेल इस्टेट रोड, कादर इस्माईल इस्टेट परिसरातील संबंधित आस्थापनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर कोणतेही वैधानिक लेबल नसलेला साबण विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या साबणांवर बॅच किंवा लॉट क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, उत्पादन परवाना क्रमांक तसेच उत्पादकाचे नाव व पत्ता यांसारखी कायद्यानुसार अनिवार्य माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. अशा प्रकारे आवश्यक लेबलशिवाय सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणे कायद्याने गुन्हा मानला जातो.
या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या साबणाचे दोन नमुने पुढील तपास आणि गुणवत्तेच्या विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कायद्यानुसार आवश्यक लेबलशिवाय कोणतेही सौंदर्यप्रसाधन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणे ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा उत्पादनांचा स्रोत, गुणवत्ता आणि सुरक्षितता पडताळणे कठीण होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
