वसुंधरेला ‘डॅमेज’ करणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.

आकर्षक प्लास्टिक पॅकेजिंगमुळे वाढणारा कचरा, पुनर्वापरातील अडचणी आणि पर्यावरणासमोर उभे राहिलेले गंभीर संकट यावर आधारित विशेष विश्लेषण. | स्थानिक समाचार | www.sthaniksamachar.com

आकर्षक प्लास्टिक पॅकेजिंगमागील पर्यावरणीय संकट जाणून घ्या. प्लास्टिक कचरा, रिसायकलिंग आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक उपायांवर विशेष लेख.

​आजकाल स्वीटमार्टमधील चमचमीत मिठाई, रंगीबेरंगी सुकामेवा, फळे आणि इतर खाद्यपदार्थ पारदर्शक व वजनाने हलक्या प्लास्टिक बॉक्समध्ये पॅक केलेले असतात. या आकर्षक पॅकेजिंगमुळे अन्नपदार्थ दिसायला सुरेख दिसतातच सोबत हाताळायला सोपे आणि वाहून नेण्यासाठी सुटसुटीत वाटतात. धूळ, माश्या आणि मानवी स्पर्शापासून अन्न सुरक्षित राहत असल्याने ग्राहकांना ही पद्धत सोयीची वाटते, तर व्यापाऱ्यांना साठवणूक आणि विक्रीसाठी (डिस्प्ले) ती फायदेशीर वाटते.

​परंतु, या तथाकथित ‘सोयी’मुळे पर्यावरणाची मोठी किंमत चुकवावी लागत आहे, ही किंमत इतकी भयानक आहे की त्याची कल्पना करणेही कठीण आहे. नुकताच या रिकाम्या बॉक्सेसची विल्हेवाट लावताना मला एक विदारक अनुभव आला, ज्यातून हे कटू वास्तव समोर आले.

​मी हे प्लास्टिक बॉक्स फेकून न देता, रिसायकलिंगसाठी (पुनर्वापरासाठी) जावेत या उद्देशाने काळजीपूर्वक साठवून ठेवले होते. जेव्हा एक पोतभर बॉक्सेस गोळा झाले, तेव्हा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मी एका भंगार खरेदीदाराला (स्क्रॅप डीलर) बोलावले. पण त्याने हा कचरा घेण्यास स्पष्ट नकार दिला. मी त्याला म्हणालो, “मला पैसे देऊ नकोस बाबा, अगदी फुकट घेऊन जा!” त्यावर तो म्हणाला, “हे भंगार कचऱ्यात फेकून द्या. हे प्लास्टिक कोणीही विकत घेत नाही, मग मी तरी ते कशाला घेऊ?”​ मला आलेला हा अनुभव केवळ माझ्यापुरता मर्यादित नाही.हा अनुभव जळगाव असो की संपूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक नागरिकाला दररोज येत असतो. रोज गावागावांतून हजारो किलो निव्वळ बॉक्सेसचा कचरा निर्माण होतो आणि अखेर हा कचरा गाड्यांमधून तो थेट डम्पिंग ग्राउंडवर पोहोचवला जातो

भंगारवाल्याने कचरा घेण्यास नकार का दिला? याचा शोध मी घेतला असता काही महत्त्वाची तांत्रिक आणि आर्थिक कारणे मला सांगण्यात आली. त्यातील पहिले कारण म्हणजे हे बॉक्स PET (Polyethylene Terephthalate) किंवा PS (Polystyrene)अशा अत्यंत हलक्या दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवले जातात. दुसरे, संपूर्ण पोतभर बॉक्स गोळा केले, तरी त्यांचे वजन अवघे काही ग्रॅम भरते त्यामुळे हा व्यवहार आर्थिकदृष्ट्या न परवडणारा आहे. तिसरे, हे हलके प्लास्टिक वितळवून त्यावर प्रक्रिया करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही.नवीन प्लास्टिक तयार करण्यापेक्षा या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) करणे अधिक महाग पडते.चौथे कारण म्हणजे मिठाई किंवा अन्य तेलकट खाद्यपदार्थांमुळे हे बॉक्स दूषित होतात. ते धुवून स्वच्छ करणे आणि त्यानंतर त्यांच्यावर प्रक्रिया करणे भंगार व्यावसायिकांना परवडत नसते. या कारणांमुळे हे प्लास्टिक रिसायकल न होता वर्षानुवर्षे जमिनीत गाडले जाते किंवा उघड्यावर जाळले जाते; ज्यामुळे हवा, पाणी आणि मातीचे प्रचंड प्रदूषण होत आहे.

​यावर तातडीने उपाय शोधणे खूप गरजेचे आहे. या भूमिकेतून मी जेव्हा यावर उपाय काय? याचा विचार करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की या गंभीर समस्येचा विचार आता उत्पादक, शासन, विक्रेते यांनी एकत्रितरीत्या केला पाहिजे आणि आपण नागरिकांनी सुद्धा याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तसेच केवळ “प्लास्टिक वापरू नका, ते घातक आहे” असा उपदेश करून भागणार नाही, तर यासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक पातळीवर खालील ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी प्रथम शासनाने प्लास्टिकला स्वस्त आणि सक्षम पर्याय शोधण्यासाठी तातडीने विशेष ‘संशोधन आणि विकास निधी’ (R&D Fund) जाहीर करून तो उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच शास्त्रज्ञ व स्टार्टअप्सना यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मका, उसाची चिपाडे (Bagasse), महत्त्वाचे म्हणजे बांबू आणि इतर कृषी कचऱ्यापासून विघटनशील (Compostable) पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करून ते सवलतीच्या दरात बाजारात उपलब्ध करून दिले पाहिजे. यासोबत जे उत्पादक किंवा ब्रँड्स अशा प्लास्टिक पॅकेजिंगचा वापर करतात, त्यांच्यावरच हा कचरा पुन्हा गोळा करण्याची आणि त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित केली पाहिजे.

​माझा अनुभव सांगतो की, जर आपण आज या समस्येकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात आपल्या शहरांभोवती केवळ प्लास्टिक बॉक्सेसचे डोंगर उभे राहिलेले दिसतील. प्लास्टिक कचरा हटवण्याची जबाबदारी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा कचरा वेचकांची स्वीकारून हा प्रश्न सुटणारा नाही तर यासाठी वैज्ञानिक पर्याय शोधण्याची शासकीय इच्छाशक्ती आणि प्लास्टिकचा वापर नाकारण्याची नागरिकांची सजगता या दोन्ही गोष्टी एकत्र येणे गरजेचे आहे. तरच आपण या ‘प्लास्टिकच्या भयानक संकटा’पासून आपल्या वसुंधरेचे रक्षण करू शकू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!