आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

महाकवी कालिदासांच्या 'मेघदूत'मधील आषाढाच्या पहिल्या मेघापासून भारतीय मान्सून, कृषी अर्थव्यवस्था आणि शाश्वत शेतीपर्यंतचा वैज्ञानिक व साहित्यिक प्रवास. | स्थानिक समाचार | www.sthaniksamachar.com

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख.

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ||

महाकवी कालिदासांनी ‘मेघदूत’ काव्यात आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरी पर्वतावर झुकलेल्या ज्या काळ्या ढगाचे वर्णन केले, तो केवळ एका विरही यक्षाचा दूत नव्हता. तो ढग म्हणजे भारतीय उपखंडाच्या प्राणवायूचे, म्हणजेच ‘मान्सून’च्या आगमनाचे पहिले निसर्गदत्त निमंत्रण होते. साहित्यिक परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास हा दिवस विरह, निसर्गसौंदर्य आणि काव्यात्मक अनुभूतीचा सर्वोच्च बिंदू ठरतो; म्हणूनच हा दिवस आपण ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा करतो.

परंतु,या साहित्यिक सौंदर्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आजच्या वास्तवाकडे पाहतो, तेव्हा आषाढाचा हा पहिला मेघ केवळ काव्याचा विषय नसून हा विषय संपूर्ण भारताच्या ‘ कृषी अर्थव्यवतेचा कणा’ आहे हे सामाजिक भान सुद्धा आपण राखले पाहिजे. कालिदासाचा मेघ भारत वर्षात जेंव्हा बरसतो तेंव्हा भारताच्या कृषी समृद्धीची पायाभरणी होते. म्हणूनच, आषाढ महिन्याच्या या सुरुवातीला साहित्यातील संवेदनशीलता आणि मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र (Agro-Economics) यांची सांगड घालून एक शास्त्रीय संवाद होण्याची आजची गरज आहे आणि साहित्यिक जगताने याचे प्रतिबिम आपल्या साहित्यातून प्रकट करून आपली सामाजिक जबाबदारीचे भान राखले पाहिजे.ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

संस्कृत साहित्यात आषाढाच्या पहिल्या दिवसाला कमालीचे भावनिक महत्त्व आहे. उन्हाळ्याच्या तीव्र दाहकतेनंतर तृषार्त झालेली धरणी आणि आकाशात दाटून येणारे कृष्णमेघ यांच्यातील मीलनाचा हा सोहळा असतो.सारे निसर्ग अभ्यासक सुद्धा आनंदून जातात.कालिदासाने निसर्गाचे मानवीकरण करताना त्यात जी संवेदनशीलता फुंकली, ती भारतीय माणसाच्या मानसिकतेशी जोडलेली आहे. मातीचा पहिला सुवास (मृद्गंध) आणि मोरांचा केकारव हे मानवी मनाला एक आदिम आनंद देतअसतात. साहित्य आपल्याला निसर्गाशी कृतज्ञ राहण्यास शिकवते आणि याच कृतज्ञतेतून पर्यावरण रक्षणाची भावना निर्माण होते.

साहित्याचा हा आल्हाददायक आनंद घेत आपण विज्ञानाच्या डोळ्यातून पाहिले तर मान्सूनचे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि अजस्र हवामानशास्त्रीय व कृषी अर्थाचे चक्र आपल्याला नजरेसमोर उभे राहते.

भारताची जवळजवळ ८०% हून अधिक शेती आजही थेट पावसाच्या पाण्यावर (कोरडवाहू) अवलंबून आहे. आषाढातील पाऊस केवळ पिकांना पाणी देत नाही, तर भूगर्भातील पाणीपातळी वाढवतो, ज्यामुळे रब्बी हंगामाचीही सोय होते.

जेव्हा देशात मान्सून चांगला होतो, तेव्हा ग्रामीण भागात उत्पादन वाढते. शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागतो आणि त्या परिणामी ट्रॅक्टर, दुचाकी, खते, बियाणे यांपासून ते दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत (FMCG Sector) ची बाजारपेठेत मागणी प्रचंड वाढते. म्हणजेच, मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांमधील औद्योगिक चक्राची गती कापूस, सोयाबीन आणि धान पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील पावसावर अवलंबून असते.

मान्सूनचा थेट संबंध देशाच्या अन्न सुरक्षेशी (Food Security) निगडित आहे. पाऊस योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पडल्यास अन्नधान्य, कडधान्ये आणि भाजीपाल्याचे दर नियंत्रणात राहतात, ज्यामुळे देशाचा महागाई दर (Inflation) स्थिर राहण्यास मदत होते.

कृषी परिसंथेवर आजच्या बदलत्या हवामानमुळे नवीन आव्हाने उभी रहिली आहेत. आज एकविसाव्या शतकात कालिदासाचा मेघ काहीसा लहरी झाला आहे. हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमानवाढीमुळे मान्सूनच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल झाले आहेत.या प्रतिणामी कधी आषाढ कोरडा जातो, तर कधी ‘अतिवृष्टी’ आणि ‘ढगफुटी’ (Cloudburst) मुळे पिकांचे अतोनात नुकसान होते.पावसाचे दिवस कमी झाले आहेत, पण एकाच दिवसात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले आहे.

या बदलत्या काळात केवळ मान्सूनच्या आगमनाचे जरूर कौतुक करा पण सामाजिक बांहिलकी सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे.आज आपल्या समाजाला ‘हरित वैज्ञानिक दृष्टिकोन’ अंगीकारावा लागेल. हवामान अंदाजाचे अचूक तंत्रज्ञान, पाण्याचा थेंब अन् थेंब जिरवण्याचे जलव्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकणारी पिकांची विविध वाण शोधण्यावर (Climate-Resilient Agriculture) भर द्यावा लागेल. तशी चालना कृषी योजनेते दिली पाहिजे.

तेंव्हा आज गरज आहे ती साहित्याची संवेदनशीलता आणि विज्ञानाची जोड देऊन
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा उत्सव साजरा करण्याची. केवळ भूतकाळातील काव्याचे गोडवे गाण्याचे हे दिवस नाहीत, तर आता साहित्याने वर्तमानातील पर्यावरणीय समस्या,बदलता मान्सून, शेतकरी, माती आणि पाणी यांच्याशी नव्या स्वरूपात नाते जोडण्याची गरज आहे.

जेव्हा आपण कालिदासाच्या मेघदूताचा सत्कार करतो, तेव्हाच आपण भारतीय शेतीच्या शाश्वत विकासाचा आणि कृषी अर्थशास्त्राचा शास्त्रीय विचार केला पाहिजे. साहित्यातील संवेदनशीलता आणि विज्ञानाचा विवेक एकत्र आला, तरच आषाढाचा हा पहिला मेघ देशाच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थाने कृषी समृद्धीची, शेतकरी वर्गाच्या चिंताविरहित जीवनाची आणि आनंदाची बरसात करू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!