डोंबिवलीतील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; चार तरुणींची सुटका, व्यवस्थापक अटकेत

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील मसाज सेंटरवर निजामपुरा आणि विष्णुनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार तरुणींची सुटका केली. या कारवाईत व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून रोकड जप्त करून पुढील तपास सुरू आहे.

डोंबिवलीतील मसाज सेंटरमधून २२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी रस्त्यावरील एका इमारतीत सुरू असलेल्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकाला अटक केली आहे. या सेंटरमध्ये देहविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भिवंडीतील निजामपुरा पोलीस आणि विष्णुनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार तरुणींची सुटका केली.

कल्याण-डोंबिवली परिसरातील काही गृहसंकुलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून आकर्षक नावांच्या आड मसाज सेंटर सुरू असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी यापूर्वीही अशा काही सेंटरवर कारवाई करून अवैध व्यवसाय बंद केले आहेत.

डोंबिवलीतील संबंधित मसाज सेंटरबाबत दोन वर्षांपूर्वी ॲड. मंगेश कुसुरकर यांनी शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी ही माहिती निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून या मसाज सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी सेंटरमधून २२ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, व्यवस्थापकासह चार तरुणींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आल्हाट यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या कारवाईत निजामपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, हवालदार एस. डी. घुगे, अंकिता भोईर, अनिल साप्ते तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गौड आणि हवालदार सोनाली राठोड यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!