राष्ट्र उभारणीत युवाशक्तीची भूमिका महत्त्वाची : प्रमोद डोरले ;मलकापूर येथील डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विशेष व्याख्यान

डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका : आव्हाने आणि संधी’ या विषयावर प्रमोद डोरले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मलकापूरच्या डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेजमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन; युवाशक्तीच्या योगदानावर प्रमोद डोरले यांचा भर.

पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे १२ ऑगस्ट २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ‘राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका : आव्हाने आणि संधी’ या विषयावर विशेष मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते, माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ लेखक प्रमोद श्रीधर डोरले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रमोद डोरले यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत ‘युवाशक्ती हीच राष्ट्राची खरी ताकद आहे’ असा संदेश दिला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक तरुण क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांनी राष्ट्र उभारणीत युवाशक्तीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित केले.

आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात भारतीय तरुण आपल्या ज्ञान, कौशल्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत देशाचे नाव उज्ज्वल करत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांसमोर असलेल्या विविध आव्हानांना सामोरे जात उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सक्रिय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते आणि खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश बुडुखले यांनी केले, तर प्रा. सदाशिव लवंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी IQAC विभागाचे अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. योगेश सुशिर, प्रा. अमोल हळदे, प्रा. निलेश बुंधे, प्रा. योगेश जाधव, प्रा. शिवानी खेडकर, प्रयोगशाळा सहाय्यक राहिल खान, मंगेश पाटील तसेच ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी धीरज वैष्णव यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!