जिल्हा न्यायालयातील आणखी तीन प्रकरणांच्या फाइल्स गहाळ असल्याचे तपासात समोर. रामनगर पोलिसांनी कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटरला अटक केली.
घरफोडी, वाहन चोरी किंवा दागिने चोरीच्या घटना नेहमीच समोर येतात; मात्र चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयातून थेट महत्त्वाच्या खटल्यांच्या फाइल्स गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, गहाळ झालेली केस परत करण्यासाठी न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या डाटा एंट्री ऑपरेटरला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सतीश उगले यांच्या ताब्यात असलेली फौजदारी अपील क्रमांक ३/२५ (रामराज विरुद्ध सरकार) ही केस गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी न्यायालय प्रशासनाने उगले यांना विभागीय चौकशीची नोटीस बजावली.
नोटीस मिळाल्याच दिवशी प्रदीप लांडगे (रा. विसापूर) याने उगले यांना दूरध्वनी करून गहाळ झालेली केस आपल्याकडे असल्याचे सांगितले. ती परत हवी असल्यास ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. लांडगे हा बाह्य यंत्रणेमार्फत जिल्हा न्यायालयात कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
२५ हजार रुपये दिले; फाइल मात्र परत केली नाही
खंडणीच्या मागणीनंतर १० ऑगस्ट रोजी उगले आणि लांडगे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी एक साक्षीदारही उपस्थित होता. चर्चेदरम्यान उगले यांनी लांडगे याला २५ हजार रुपये रोख दिले आणि केस परत करण्याची मागणी केली.
त्यावेळी लांडगे याने संबंधित केसची फाइल दुचाकीच्या डिक्कीत असल्याचे सांगून केवळ ती दाखवली. मात्र, फाइल परत केली नाही. उर्वरित २५ हजार रुपये दिल्यानंतर केस परत करण्याचे सांगून तो तेथून निघून गेला.
यानंतर उगले यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून प्रदीप लांडगे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) आणि ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आणखी तीन प्रकरणांच्या फाइल्स गहाळ
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी तीन महत्त्वाच्या प्रकरणांच्या फाइल्स गहाळ असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विशेष पॉक्सो केस क्रमांक १९३/२५ (सरकार विरुद्ध विनय), दिवाणी अपील क्रमांक ३१/२४ (सुषमा विरुद्ध विनोद) आणि नियमित दिवाणी मुकदमा क्रमांक २१६/२५ (सुषमा विरुद्ध विनोद) या प्रकरणांचा समावेश आहे.
या प्रकारामुळे न्यायालयातील महत्त्वाच्या प्रकरणांच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या फाइल्स नेमक्या कशा गहाळ झाल्या आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास रामनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
