जळगाव-अजिंठा चौकाजवळ अपघातात भुसावळच्या वरुण सुरवाडेचा मृत्यू, तर पवन अडकमोल गंभीर जखमी. एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू.
शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने अचानक बोलेरो वाहन आल्याने घाबरलेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट टँकरखाली गेली. या दुर्घटनेत वरुण विजय सुरवाडे (२१, रा. भुसावळ) या आयटीआय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वरुण सुरवाडे याच्यासह पवन अनिल अडकमोल आणि नीरज रवींद्र कोचुरे हे तिघेही जळगाव येथील शासकीय आयटीआयचे विद्यार्थी आहेत. सोमवारी कॉलेज सुटल्यानंतर तिघे दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने जात होते. त्यावेळी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात विरुद्ध दिशेने अचानक बोलेरो वाहन आल्याने दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी टँकरखाली गेल्याने हा भीषण अपघात झाला.
अपघातात वरुणचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. पवन अडकमोल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नीरज कोचुरे याला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर तिघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी वरुणला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रुग्णालयात मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईक आणि मित्रांनी मोठा आक्रोश केला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताचे नेमके कारण आणि बोलेरो वाहनाची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
