जळगाव। नाशिक येथील बहुचर्चित लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी कॅप्टन अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाशी नाव जोडले गेलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले असून, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणानंतर सोशल मीडियावर रूपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या गुन्ह्यात चाकणकर यांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप आंदोलक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहिल्या तर या प्रकरणाच्या तपासात त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे या पदावरून पायउतार होणे गरजेचे आहे.” जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील आणि उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
