मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दि. २४/०३/२०२६ (मंगळवार) रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला.
विद्या भारती शैक्षणिक मंडळ, अमरावतीचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब दादा शेखावत यांच्या संकल्पनेतून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संजय सैन्दाने आणि बी.सी.ए. विभाग प्रमुख डॉ. अजित कुळकर्णी यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्राचार्य महोदय इतर शैक्षणिक कामांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजित कुळकर्णी यांनी स्थान भूषविले.
या कार्यक्रमात वाणिज्य विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी गाणी व नृत्य सादर करून वातावरण आनंदमय केले. तसेच तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी प्रा. अमर पाटील व प्रा. विशाल धुंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. अजित कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये मागील तीन वर्षांत झालेल्या सकारात्मक बदलांचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील संधी व आव्हानांबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
निरोप समारंभात तृतीय वर्षातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत गेल्या तीन वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षणाचा प्रवास संपत आल्याची जाणीव आणि मित्र-मैत्रिणींशी होणारा विरह यामुळे अनेक विद्यार्थी भावूक झाले. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आश्वासन देत भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. राजरत्न पोहेकर आणि प्रा. प्रकाश खिल्लारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.
#farewellparty #b.comstudents #sthaniksamachar
