तृतीयपंथीय आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘बीज भांडवल योजना’चा लाभ घेण्याचे आवाहन : Government Scheme For Trangenders

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकाराने तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.

शासन निर्णय दि. १३ मार्च २०२६ नुसार या योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार असून, यामुळे त्यांच्या स्वावलंबनाला चालना मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास मदत होईल.

योजनेअंतर्गत २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असून, निधीचे वाटप ४५% शासन अनुदान, ५०% बँक कर्ज आणि ५% लाभार्थी हिस्स्याने केले जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजामध्ये ३० टक्क्यांपर्यंत सवलतही दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी कोणत्याही जामीनदाराची किंवा तारणाची आवश्यकता नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे, तसेच तो/ती महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्षांचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकरणाने दिलेले तृतीयपंथीय ओळखपत्र अनिवार्य आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

#governmentschemes #transgenders #jalgaon #sthaniksamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!