भुसावळ : शहरातील मुस्लिम कॉलनी परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. चिराग हॉलच्या मागील सत्य साईनगर भागात शुक्रवारी रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी बेधडक फायरिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय जाधव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची सखोल पाहणी सुरू केली असून गोळीबार झालेल्या ठिकाणी गोळ्यांचे अवशेष व अन्य पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
ही फायरिंग नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली आणि यामागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात अशा प्रकारे खुलेआम गोळीबार होणे हे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. “गुन्हेगारांना भीती उरली नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरात बेकायदेशीर गावठी कट्टे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने विशेष शोध मोहीम राबवून अशा शस्त्रसाठ्याचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनी पोलिसांकडे खालील उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे:
- संशयितांची सखोल चौकशी
- रात्रीची गस्त वाढवणे
- गुन्हेगारांवर कठोर कारवाई
- समाजात कायद्याचा धाक निर्माण करणे
तसेच नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
भुसावळ शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिस प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलून अशा घटनांवर आळा घालणे ही काळाची गरज बनली आहे.
#bhusawal #firing #sthaniksamachar #bhusawalpolice

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
