३८५ भूखंडांच्या वापरावर संशय; जळगाव महापालिकेत खळबळ महसूल बुडतोय का? नगरसेवक अरविंददेशमुखांचा प्रशासनाला सवाल

महानगरपालिका मालमत्ता वापर

जळगाव महापालिकेच्या ३८५ भूखंडांच्या वापरावर संशय; नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महसूल बुडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाकडून सविस्तर माहितीची मागणी केली.

 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या मंगल कार्यालये, सामाजिक सभागृह तसेच सुमारे ३८५ खुल्या भूखंडांच्या वापर आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र देत प्रशासनाला जबाबदारीच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
महानगरपालिकेच्या विविध सभागृहांमधून प्रत्यक्षात किती उत्पन्न मिळते, ती कोणत्या पद्धतीने चालवली जात आहेत आणि व्यवस्थापनात पारदर्शकता आहे का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासोबतच शहरातील सुमारे ३८५ खुले भूखंड विविध संस्था व संघटनांना वापरासाठी देण्यात आले असून, त्यांचा सध्याचा वापर काय आहे, करार अटींचे पालन होत आहे का आणि महानगरपालिकेला अपेक्षित महसूल मिळतो आहे का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
अरविंद देशमुख यांनी दिलेल्या पत्रात सर्व सभागृहांची संपूर्ण यादी, मागील पाच वर्षांचा उत्पन्नाचा तपशील तसेच भूखंडांचे सर्वे नंबर, देण्यात आलेल्या परवानग्या, सध्याचा वापर आणि संभाव्य गैरवापर याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. तसेच ज्या मालमत्तांचा योग्य वापर होत नाही किंवा ज्यातून अत्यल्प उत्पन्न मिळते, अशांची स्वतंत्र यादी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या मालमत्तांचा प्रभावी वापर न झाल्यास कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची शक्यता व्यक्त होत असून, या मुद्द्यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढविणे, गैरव्यवहाराला आळा घालणे आणि प्रशासनात पारदर्शकता निर्माण करणे हा या पुढाकारामागील मुख्य उद्देश असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *