संपूर्ण जिल्ह्यात २१३ हॉटेल्स-ढाब्यांवर पोलिसांचा अचानक छापा; ११६ जणांची चौकशी ;१०० तलवारी जप्त, २ अनधिकृत हॉटेल्स कायमस्वरूपी बंद

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; २१३ हॉटेल्स-ढाब्यांवर छापे टाकून १०० तलवारी जप्त, ११६ जणांची चौकशी व २ अनधिकृत हॉटेल्स बंद.

रात्रीच्या कारवायांनी गुन्हेगारी जगतात खळबळ; एनडीपीएस गुन्हेगार ताब्यात, अनेकांवर कारवाई.

गुन्हेगारांकडून रात्रीच्या वेळी हॉटेल्स व ढाब्यांचा वापर गुन्ह्यांच्या नियोजनासाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष सूचनेनुसार २ मे रोजी रात्री संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी २१३ हॉटेल्स आणि ढाब्यांची अचानक तपासणी करण्यात आली.

या व्यापक सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी संशयितांकडून तब्बल १०० तलवारी जप्त केल्या असून अनेक ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.

रात्री ९ ते ११ दरम्यान मोठी कारवाई

पोलिसांच्या विशेष पथकांनी २ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत ही झडती मोहीम राबवली. हॉटेल्स आणि ढाब्यांवर अचानक पोहोचून प्रत्येक ठिकाणची कसून तपासणी करण्यात आली. या दरम्यान दारूबंदी आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गतही अनेक संशयितांवर कारवाई झाली.

एनडीपीएस गुन्हेगार ताब्यात, ११६ जणांची चौकशी

या कारवाईत एका एनडीपीएस कायद्यातील गुन्हेगारालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दारूबंदी कायद्यानुसार ११६ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५ जणांवर कारवाई करण्यात आली असून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोन अनधिकृत हॉटेल्स कायमची बंद

तपासणीदरम्यान अनधिकृतरीत्या चालवली जाणारी २ हॉटेल्स पोलिसांनी तात्काळ बंद केली आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत व्यवसायांवरही कडक संदेश गेला आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून, पुढील काही दिवसांत अशा आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!