दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसरातील स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी आज भव्य मोर्चा व दुचाकी रॅली

दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसरातील स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भुसावळ येथे आयोजित रोजगार हक्क मोर्चा व दुचाकी रॅली. स्थानिक रोजगार, पारदर्शक भरती आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची प्रमुख मागणी.

भुसावळ, यावल, रावेर व तापीकाठच्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी आज दीपनगर रोजगार हक्क मोर्चा. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची प्रमुख मागणी.

दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आज (दि. ९ जून) वंचित बहुजन आघाडीतर्फे “दीपनगर रोजगार हक्क मोर्चा व दुचाकी रॅली” आयोजित करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त, प्रदूषणग्रस्त आणि बेरोजगार युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या धुराड्यांतून निर्माण होणारी वीज संपूर्ण राज्याला उजेड देत असली, तरी प्रकल्पाच्या २५ किलोमीटर परिसरातील अनेक युवकांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकल्पासाठी स्थानिकांच्या जमिनी गेल्या, प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसला, राखेचे ढीग गावांच्या परिसरात साचले आणि आरोग्याच्या समस्याही स्थानिकांच्या वाट्याला आल्या; मात्र रोजगाराच्या संधी मात्र बाहेरील व्यक्तींना दिल्या जात असल्याने युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

भुसावळ, यावल, रावेर आणि तापी नदीकाठच्या गावांतील युवकांनी रोजगाराच्या प्रश्नावर आता एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक शिक्षण घेतलेल्या अनेक युवकांना नोकरीच्या शोधात इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. दुसरीकडे प्रकल्पाशी संबंधित विविध कंत्राटी कामांमध्ये बाहेरील मनुष्यबळाची भरती होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

आज निघणार रोजगार हक्क मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भुसावळ येथून भव्य मोर्चा व दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली तेथून दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प, शकींगड येथे जाणार असून स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर प्रशासन आणि महाजेनकोचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त, प्रदूषणग्रस्त गावांतील नागरिक, बेरोजगार युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

प्रमुख मागण्या

  • मोर्चाच्या माध्यमातून पुढील मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत –
  • प्रकल्पाच्या २५ किलोमीटर परिसरातील स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे.
  • सर्व कंत्राटदार कंपन्यांनी स्थानिक भरतीची टक्केवारी जाहीर करावी.
  • रोजगार भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी.
  • स्थानिक युवकांसाठी विशेष कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे.
  • महाजेनको व प्रशासनाने स्थानिक रोजगाराबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे.
  • प्रकल्पग्रस्त व प्रदूषणग्रस्त गावांतील युवकांसाठी विशेष रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात.

“रोजगार हा आमचा अधिकार आहे”

वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी सांगितले की, “रोजगार हा स्थानिक युवकांचा घटनात्मक आणि सामाजिक अधिकार आहे. जमीन आमची, प्रदूषण आमच्या वाट्याला आणि रोजगार मात्र इतरांच्या हातात, ही परिस्थिती आम्ही यापुढे सहन करणार नाही. प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदार कंपन्यांनी स्थानिकांना न्याय द्यावा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.”

“रोजगार आमचा अधिकार आहे, भीक नाही”, “स्थानिकांना रोजगार द्या” आणि “राख आमच्या वाट्याला, रोजगार आमच्या हातात” अशा घोषणांनी आजचा मोर्चा दुमदुमणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाकडे आता संपूर्ण भुसावळ, यावल, रावेर आणि तापी काठच्या परिसराचे लक्ष लागले असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!