वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा; जळगावातील वाघ नगर पाणीप्रश्न तापला

जळगावातील वाघ नगर परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी व नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 15 दिवसांत तोडगा न निघाल्यास मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा दिला.

जळगावच्या वाघ नगर परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त. नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन सादर.

 जळगाव शहरालगत असलेल्या वाघ नगर परिसरात मागील काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून परिसरातील नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी व वाघ नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जळगाव महानगरपालिका हद्दीतील बहुतांश भागात एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाघ नगर परिसरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्र काळात ही समस्या अधिक गंभीर झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता व दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भार वाढत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परिसरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पाणीटंचाईमुळे मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत—

वाघ नगर परिसरात तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, शहरातील इतर भागांप्रमाणे किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून पूर्वसूचना द्यावी, उन्हाळ्यात अतिरिक्त पाणीपुरवठ्याची विशेष व्यवस्था करावी, आवश्यक असल्यास नवीन पाइपलाईन, जलसाठा व तांत्रिक सुविधा विकसित कराव्यात.

निवेदनात पुढे इशारा देण्यात आला आहे की, आगामी १५ दिवसांत समाधानकारक तोडगा न निघाल्यास वंचित बहुजन आघाडी आणि वाघ नगर नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, या निवेदनामुळे वाघ नगर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!