उत्सव आनंदाचा की लेझरच्या दहशतीचा?

गणेशोत्सव आणि मिरवणुकांमध्ये प्रखर लेझर लाईटच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांचे आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत निर्माण झालेले गंभीर प्रश्न.

उत्सवातील लेझर लाईटचा वाढता वापर आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी कसा धोकादायक ठरू शकतो? कायदे, दंडात्मक तरतुदी आणि नागरिकांची जबाबदारी यावर सविस्तर लेख.

नुकत्याच झालेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात लेझरमुळे दुखापत झाल्याच्या विदारक घटना घडल्या आहेत. मागील वर्षी महाराष्ट्रात सार्वजनिक सण आणि विसर्जन मिरवणुका दरम्यान प्रखर लेझर किरणांमुळे ६५ पेक्षा जास्त लोकांच्या दृष्टीचे गंभीर नुकसान झाल्याची नोंद झाली होती.

लेझर बीम म्हणजे अत्यंत तीव्र, एकवटलेला आणि एकाच दिशेने प्रवास करणारा कृत्रिम प्रकाशाचा किरण होय. सामान्य बल्ब किंवा टॉर्चचा प्रकाश सर्व दिशांना पसरतो आणि लांब जाताच अंधुक होतो. परंतु, लेझर बीमचा प्रकाश पसरत नाही; तो एका बारीक रेषेसारखा मैलोनमैल अतिशय तीव्र गतीने सरळ रेषेत प्रवास करतो. उत्सव आणि सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डिझाईन आणि शोभेसाठी अत्यंत तीव्र लेझर दिवे व आकर्षित करणारे वेगवेगळ्या रंगाचे, वेगाने फिरणारे आणि लांबपर्यंत जाणारे लेझरचे झोत फेकले जातात. लग्न समारंभात, उच्च-तीव्रतेचे लेझर दिवे हे एक प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे. आनंद व उत्साहाच्या वातावरणात लेझर बीम हे मानव जातीला व पशूपक्षांसाठी पण किती घातक आहे, याकडे दुर्लक्ष होताना दिसते. ५ मिलिवॅटपेक्षा जास्त शक्तीच्या लेझर किरणांमुळे डोळ्यांचे कायमचे नुकसान, पाळीव प्राण्यांमध्ये वर्तणुकीशी संबंधित तणाव आणि वन्यजीवांच्या डोळ्यांच्या पडद्याला भाजणे यांसारख्या समस्या उद्भवतात, तर वाहतुकीसाठी त्यांचा गैरवापर केल्याने मोठे सामाजिक धोके निर्माण होतात.

वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लेझरची तीव्र किरणे थेट डोळ्यात पडल्यास डोळ्याच्या मागील दृष्टि पटल जळतो, यामुळे दृष्टी कायमस्वरूपी धूसर होऊ शकते किंवा पूर्णपणे अंधत्व येऊ शकते. लेझरच्या उष्णतेमुळे डोळ्यातील पेशी अत्यंत कमी वेळात नष्ट होतात व त्यामुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे आणि अचानक अंधारी येणे असा त्रास होऊ शकतो. लेझरच्या उच्च उर्जेमुळे दृष्टी पटलातील अत्यंत नाजूक रक्तवाहिनी फुटतात, त्यामुळे डोळ्यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो आणि अचानक दिसेनासे होऊ शकते. अत्यंत उच्च क्षमतेचे लेझरचे किरण थेट त्वचेवर बराच वेळ पडल्यास त्वचेची जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो. मिरवणुकीच्या गर्दीत लेझरच्या सततच्या तीव्र लेझर लाईट्समुळे, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना चक्कर येणे, डोकेदुखी, काहींना फेफरे येण्यासारखे गंभीर त्रास होऊ शकतात.

वाहन चालवताना, लेझरचा प्रकाश अचानक डोळ्यावर पडल्यास, तात्पुरती अंधारी येते, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. विमान तळाजवळ लेझर बीम, उच्च-तीव्रतेचे दिवे आणि आकाशाकडे प्रकाश प्रक्षेपित केल्याने, लँडिंग आणि टेक ऑफच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये वैमानिकांना अंधारी येऊ शकते किंवा त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. लेझरचे किरण मोबाईल किंवा कॅमेराच्या लेन्सवर पडल्यास कॅमेऱ्याचे सेन्सर पूर्णपणे खराब होतात.

नुसते मानव जातीला नाही, तर पशु प्राण्यांना पण लेझरचा त्रास सहन करावा लागतो. प्रकाशबिंदूंचा पाठलाग केल्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये तीव्र निराशा, आक्रमकता आणि असामान्य पुनरावृत्ती वर्तन (जसे की एकटक पाहणे किंवा सावलीचा पाठलाग करणे) निर्माण होते, कारण त्यांना एक प्रत्यक्ष दिसणारी वस्तू मिळत नाही. पक्ष्यांच्या रेटिनामधील उष्णता थंड करण्यासाठी पृष्ठभागावर रक्तवाहिन्या नसतात. उच्च-शक्तीचे लेझर ३० मीटरपेक्षा कमी अंतरावरूनही कॉर्नियाला सूज, मोतीबिंदू आणि रेटिनल ऊतींचे आकुंचन घडवून आणतात. लेझरमुळे पक्ष्यांच्या दृष्टी निरीक्षण करण्याच्या पद्धतीत बदल होतो आणि अल्पकाळासाठी त्यांच्या शरीराचे वजन कमी होते, तरीही प्राणी सहसा काही दिवसांत त्यांचे वजन पुन्हा वाढवतात.

“मग लेझर बीम उत्पादनावर कोणतीही कायदेशीर सरसकट बंदी का नाही?” याचे महत्त्वाचे कारण की लेझर यंत्रे किंवा बीम फक्त सण-उत्सवांमध्ये किंवा डीजेवर नाचण्यासाठीच वापरले जात नाहीत, तर त्यांचे उत्पादन वैद्यकीय क्षेत्रात लेझर शस्त्रक्रिया, डोळ्यांचे ऑपरेशन आणि त्वचेचे उपचार करण्यासाठी पण होते. औद्योगिक क्षेत्रात धातू कापणे, वेल्डिंग आणि खोदकाम, विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात प्रयोगशाळा व सादरीकरण आणि बांधकाम क्षेत्रात लेव्हलिंग करण्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे लेझर बनविण्यावर किंवा त्याच्या कारखान्यांवर सरकार पूर्णपणे बंदी घालू शकत नाही.

लेझर तयार करण्यावर बंदी नसली तरी, अवाजवी किंवा घातक हाय-पॉवर लेझर बाजारात येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने गुणवत्ता नियंत्रण कडक केले आहेत. लेझर बनवणाऱ्या कंपन्यांना आणि उपकरणांना आता भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक केले जात आहे. तसेच, मानवी सुरक्षेसाठी ठराविक क्षमतेपेक्षा (५ मिलीवॅटपेक्षा जास्त) तीव्रतेचे हँडहेल्ड लेझर पॉइंटर्स बनविण्यावर आणि आयात करण्यावर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारतात कडक नियम आहेत.

पोलीस प्रशासन केवळ उत्सव, मिरवणुका, डीजे किंवा रस्त्यांवरील व्यावसायिक वापरावर कारवाई करते. जर एखाद्याने घरात बसून किंवा कंपनीत कायदेशीर वापरासाठी लेझर उपकरण तयार केले किंवा ठेवले, तर त्यावर कारवाई होत नाही. परंतु, तेच उपकरण जर रस्त्यावर आणून सार्वजनिक शांतता संपकिंवा आरोग्याला धोका निर्माण केला, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत थेट जप्ती आणि गुन्हा दाखल होतो.

सुरक्षेच्या दृष्टीने ‘लेझर’ वापरा संबंधात कठोर कायदे आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अंतर्गत जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त शहरात किंवा विशिष्ट परिसरात लेझर लाइट्सवर प्रतिबंध घालू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने किंवा मंडळाने प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून लेझरचा वापर केला, तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो.

लेझर बीम बंदीचे उल्लंघन केल्यास आणि जर लेझरमुळे मिरवणुकीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला, किंवा विमान प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा पोहोचली, तर ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा १०,००० रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर लेझर बीममुळे एखाद्या नागरिकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली किंवा तो कायमचा अंध झाला, तर निष्काळजीपणामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात आल्यामुळे, पोलीस थेट भारतीय न्याय संहिता कलम १२५ आणि १२५-ए अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतात. यात गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ३ महिन्यांपासून ते ३ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे. तुरुंगवास, व्यतिरिक्त नियम मोडणाऱ्या मंडळांचे आणि लेझर मालकांचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहते. लेझर पुरवणाऱ्या व्यावसायिकाचा व्यवसाय परवाना आणि पोलीस परवानगी कायमची रद्द केली जाऊ शकते. सार्वजनिक मंडळात लेझरचा वापर केल्यास केवळ लेझर ऑपरेटर नव्हे, तर मंडळाच्या अध्यक्षांवर आणि पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातात, ज्यामुळे त्यांची न्यायालयीन पाश्वभूमी खराब होते. नुकतेच पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीला लेझर वापरल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून दंडाची शिक्षा सुनावली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरपर्यंत मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अति प्रखर लेझर लाईट आणि बीम लाईटमुळे होणारे धोके लक्षात घेऊन कडक निर्बंध लादले आहेत. नागरिकांनी पण याचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आनंदात दुसऱ्याला त्रास होऊ नये याचे भान ठेवणे हेच एका सुसंस्कृत, प्रगतीशील आणि सजग नागरिकाचे खरे कर्तव्य आहे. आता गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, लाडका बाप्पाही हळहळेल… जेव्हा लेझरमुळे कोणाची तरी दृष्टी जाईल, हे पण सर्व नागरिक ध्यानात ठेवतील, हीच माफक अपेक्षा.

प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक : 7276614260

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!