क्विक हील फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमात पारंपरिक पोवाड्यातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर पोवाड्याचे अनोखे आणि प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी मावळे सज्ज असायचे. त्याच धर्तीवर आजच्या डिजिटल युगात आपल्या डिजिटल जगाचे संरक्षण करण्यासाठी ‘सायबर योद्धे’ सज्ज आहेत, ही संकल्पना पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
पूर्वी शत्रूंकडून गड-किल्ल्यांना धोका निर्माण होत असे; आजच्या काळात मात्र सायबर गुन्हेगारांकडून मोबाईल, सोशल मीडिया खाती, वैयक्तिक माहिती तसेच डिजिटल व्यवहारांना धोका निर्माण होऊ शकतो. डिजिटल जगातील या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सजगता आणि जबाबदार डिजिटल वर्तन किती आवश्यक आहे, हा संदेश पोवाड्यातून प्रभावीपणे देण्यात आला.
हा विशेष सायबर पोवाडा सायबर वॉरिअर अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, प्राची भोसले आणि गायत्री मायकर यांनी सादर केला. पारंपरिक पोवाड्याची शैली आणि आधुनिक सायबर सुरक्षेचा विषय यांचा सुरेख मेळ साधत विद्यार्थ्यांपर्यंत महत्त्वाची माहिती मनोरंजक व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आली.
पोवाड्याच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, OTPची सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, सोशल मीडिया सुरक्षा आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ‘आजचे सायबर वॉरियर्स’ ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडत डिजिटल जग अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले.
पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेसारखा आधुनिक आणि महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ‘ताल पोवाड्याचा, संदेश सायबर सुरक्षेचा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण तसेच लक्षवेधी ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
