विद्यार्थी हक्कांसाठी सावद्यात १ ऑक्टोबरला मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध मागण्यांसाठी सावदा शहरात १ ऑक्टोबरला विद्यार्थी हक्क मोर्चाचे आयोजन; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा.

सावदा, ता. रावेर येथे विद्यार्थी हक्क मोर्चाचे आयोजन; शाळांच्या दुरुस्तीपासून शिक्षक पदे भरण्यापर्यंत विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे निवेदन.

 सावदा शहरातील नगरपरिषद तसेच इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यार्थी हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विशाल भाऊ प्रेमचंद तायडे यांनी सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तसेच छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीनेही स्वतंत्र निवेदन देऊन विद्यार्थी हक्क मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

निवेदनात सावदा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, पंखे, ट्यूबलाईट, CCTV, आवश्यक शैक्षणिक सुविधा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपलब्धता यांसंदर्भातील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

  • नगरपरिषद शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन आवश्यकतेनुसार वॉटर कूलर बसविण्यात यावेत.
  • सर्व शाळांमध्ये लाईट फिटिंग, पंखे, ट्यूबलाईट, CCTV तसेच आवश्यक विद्युत व इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
  • शाळांमधील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करून त्यांची देखभाल तसेच पाण्याची सुविधा सुनिश्चित करावी.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील स्वच्छतागृह व सांडपाण्याच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी.
  • जुन्या शाळांच्या इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व नूतनीकरण करावे.
  • नगरपरिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी तसेच आवश्यक शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी.
  • शाळांच्या नियमित देखरेखीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करून त्यामध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक, पालक व शिक्षक प्रतिनिधींचा समावेश करावा.

निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ व २१-अ तसेच Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 यांचा संदर्भ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि मूलभूत सुविधांनी युक्त शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

१ ऑक्टोबरला विद्यार्थी हक्क मोर्चा

निवेदनानुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सावदा नगरपरिषद कार्यालयापर्यंत विद्यार्थी हक्क मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चानंतरही मागण्यांबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

छात्र भारतीचे बुद्धभूषण बगाडे, शुभम लोंढे आणि आशुतोष तायडे यांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक सुविधा व त्यांच्या हक्कांशी संबंधित मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!