दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा; माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या अधिकारांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा, अर्ज व अपील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा. पी. एस. पाडवी, संदीप पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती.

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात २६ सप्टेंबर २०२६ रोजी माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पी. एस. पाडवी होते. तसेच पर्यवेक्षक श्री. ए. एन. बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. संदीप पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक करताना श्री. बाबासाहेब जाधव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत असलेली अपील प्रक्रिया तसेच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यानंतर प्रमुख वक्ते श्री. संदीप पाटील यांनी माहिती अधिकाराची गरज आणि महत्त्व यावर मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतची विविध प्रकारची माहिती माहिती अधिकाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने मागवता येते, तसेच त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबावी लागते, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पी. एस. पाडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही व्यक्ती माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करू शकते. प्राप्त झालेल्या अर्जावर संबंधित जन माहिती अधिकाऱ्याने नियमानुसार निर्धारित कालावधीत उत्तर देणे आवश्यक असते. माहिती न मिळाल्यास संबंधित व्यक्तीला पुढील अपील करण्याची तरतूद कायद्यात आहे. माहिती देण्यात कसूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई तसेच दंडाची तरतूद आहे. तसेच राष्ट्रहिताला बाधा पोहोचवणारी किंवा कायद्यातील अपवादात्मक तरतुदींमध्ये येणारी माहिती मागवता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माहिती अधिकार कायद्याच्या विविध तरतुदी, अर्ज प्रक्रिया, अपील प्रक्रिया आणि नागरिकांचे अधिकार याबाबत विद्यार्थ्यांना उपप्राचार्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या अंतर्गत श्री. बाबासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. टी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रमोद आर. पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास श्री. भूषण बिरारी, श्री. संदीप देवरे, श्रीमती अनीता सांगोरे, श्री. दिनेश अलाम यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!