भांडण सोडवणे पडले महाग; जळगावात तरुणाच्या कपाळावर तलवारीने वार. शाहबाज उर्फ नगीनासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा.
जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील अक्सा नगर येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी तरुणाचे नाव शेख इस्माईल शेख असगर (वय २५, रा. छोटी मिल्लत शाळेजवळ, अक्सा नगर, मेहरूण, जळगाव) असे असून, तो मजुरी करून उदरनिर्वाह करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १८ एप्रिल) रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास अक्सा नगरमधील छोटी मिल्लत शाळेजवळील नाल्याजवळ इस्माईलचा मित्र अल्तमश आणि काही संशयित आरोपी यांच्यात वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी इस्माईल मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, आरोपींनी संतापून त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपी शाहबाज उर्फ नगीना याने इस्माईलच्या कपाळावर तलवारीने जोरदार वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तौसिफ पाशा उर्फ बिहारी याने लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर उजेर पिरजादा याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमी इस्माईलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इस्माईलने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी शाहबाज उर्फ नगीना, तौसिफ पाशा उर्फ बिहारी आणि उजेर पिरजादा (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
