पोलीस ठाण्यात कोयता घेऊन तरुणाचा धुमाकूळ; पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

एरंडोल पोलीस ठाण्यात शिरून तोडफोड करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केलेली कारवाई आणि घटनास्थळाचा पंचनामा दर्शवणारे चित्र.

पोलीस ठाण्यातच पोलिसांना जीवे मारण्याची धमकी! एरंडोल येथील समाधान अहिरे नावाच्या तरुणाने कोयत्याने केला राडा; वाचा धक्कादायक घटना.

आपल्या ओळखीच्या संशयितांना अटक का केली नाही, या कारणावरून एका तरुणाने थेट पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घालत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना एरंडोल येथे घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना समाधान राधो अहिरे (वय ३२, रा. केवडपुरा, एरंडोल) हा तरुण हातात धारदार कोयता घेऊन पोलीस ठाण्यात शिरला. त्याने ‘तुम्ही संबंधित आरोपींना अटक का केली नाही?’ असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरड सुरू केली.

यावेळी संतापाच्या भरात त्याने हातातील कोयत्याने पोलीस ठाण्यातील भिंतीवर लावलेल्या टीव्हीवर वार केले. या हल्ल्यात टीव्हीची वायर तुटून तो बंद पडला. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही प्रणालीच्या मॉनिटरवरही कोयत्याने वार करत त्याचे नुकसान केले.

याचदरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करत संशयित समाधान अहिरे याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी मुकेश आमले यांच्या अंगावर कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर पोलीस कर्मचारी दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात समाधान अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *